शेतकरी कर्जमाफीबाबत चर्चेसाठी मंत्र्यांची समिती

मुंबई, 9 जून 2017/AV News Bureau:

राज्यातील निरनिराळ्या शेतकरी संघटनांशी कर्जमाफीसह विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वात एका उच्चाधिकार मंत्रिगटाची नियुक्ती केली आहे.

राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते हे या उच्चाधिकार मंत्रिगटाचे सदस्य असतील. हा उच्चाधिकार मंत्रिगट सर्व शेतकरी नेत्यांशी चर्चा करून आपला प्रस्ताव निर्णयासाठी शासनाकडे सादर करील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

कोणतेही प्रश्न हे चर्चेतूनच सोडविले जात असतात आणि शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नावर शेतकरी नेत्यांशी चर्चा करण्याची शासनाची तयारी आहे, याचा पुनरूच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार केला आहे. शेतकरी नेत्यांनी सुद्धा चर्चेतून मार्ग काढावा, असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे.