उद्धव ठाकरे प.विदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या मेळावा घेणार

15 जून रोजी शेगावच्या दौऱ्यावर जाणार

मुंबई, 12 जून 2017/AV News Bureau:

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 15 जूनला शेगावच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरे पश्चिम विदर्भातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत. शेतकरी कर्जमाफी तसेच इतर प्रश्नांवर सत्तेत असूनही शिवसेनेने राज्यव्यापी शिवसंपर्क अभियान राबवून भाजपविरोधी भूमिका घेतली. त्यामुळे पश्चिम विदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे शिवसैनिकांना कोणती सूचना करतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र हे यश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनांच्या लढ्याला मिळाल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. तसे पोस्टरही मुंबईत झळकत आहेत.  त्यामुळे शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून  भाजप आणि शिवसेनेमध्ये श्रेयाची लढाई सुरू होणार असून भविष्यात दोन्ही पक्षांमधील शीतयुद्ध कमी होणार नसल्याचे दिसून येते.

शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे 15 जून रोजी  शेगावला जाणार आहेत. दुपारी 12 वाजता गजाजन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे पश्चिम विदर्भातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत. मेळावा संपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधून शिवसेनेची पुढील रणनिती जाहीर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.