भादली रेल्वेस्थानकातील बालकवींच्या स्मारकाचे नूतनीकरण

केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांचे रेल्वेच्या निर्माण विभागाला आदेश

मुंबई,4 मार्च 2017/ AV News Bureau:

त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवी यांच्या भादली रेल्वे स्थानकावरील स्मारकाची दुरवस्था झाली आहे. याबाबत सातत्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती. अखेर याबाबात केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी या स्मारकाचे नूतनीकरण आणि प्रशस्त जागेत स्थलांतर करण्याचे आदेश रेल्वेच्या निर्माण विभागाला दिले आहेत.

पुढील वर्षी मे महिन्यात बालकवींचा शंभरावा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने या स्मारकाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. भादली रेल्वे स्थानकावर रेल्वे रूळ ओलांडताना 5 मे 1918 रोजी त्यांचा वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी मृत्यू झाला होता. त्यांच्या स्मरणार्थ भादली रेल्वे स्थानकावर एक चबुतरा उभारण्यात आला आहे. या चबुत-यावर बालकवींची निर्झरास ही कविताही कोरण्यात आली आहे. मात्र या स्मारकाची दुरवस्था झाली आहे. आता या स्मारक परिसरात सुशोभिकरणही करण्यात येणार आहे.