नापास विद्यार्थ्यांची 18 जुलै रोजी पुरवणी परीक्षा

19 जूनपासून पुवरणी परिक्षेसाठी अर्ज स्वीकारणार

नवी मुंबई, 13 जून 2017/AV News Bureau:

दहावीच्या परिक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पास होण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे. परिक्षा दिलेल्या 16 लाख 44 हजार 16 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून 14 लाख 58 हजार 855 विद्यार्थी पास झाले आहेत. त्यामुळे नापास झालेल्या  विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परिक्षा घेण्यात येणार आहे. या पुरवणी परिक्षेसाठी 19 जूनपासून अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

नियमित विद्यार्थ्यांव्यतिरिक्त पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनाही या संधीचा लाभ मिळेल. सुमारे 1 लाख 13 हजार 124 पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 47 हजार 630 उत्तीर्ण झाले आहेत.

या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष फुकट जावू नये यासाठी माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र परिक्षेत अनुत्तीर्ण (नापास) झालेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणार आहे. पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज 19 जून 2017 पासून स्वीकारण्यात येणार आहेत. पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक लवकरच मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.जुलै-ऑगस्ट 2017 ची पुरवणी परीक्षा 18 जुलै 2017 पासून सुरू होणार असल्याची माहिती मुंबई विभागाचे अध्यक्ष जगताप यांनी दिली.

  • दोन विषयांत नापास झाल्यास एटीकेटी

मार्च 217 मध्ये परिक्षा दिलेल्या आणि  जास्तीत जास्त दोन विषयांमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना 2017-18 च्या शैक्षणिक वर्षासाठी एटीकेटी ची सुविधा लागू राहणार आहे. एटीकेटी सवलतीमुळे विद्यार्थ्याला 11 वीला मिळणारा प्रवेश तात्पुरता स्वरुपाचा असणार आहे.  त्यामुळे 11 वीत शिकत असतानाच एटीकेटी मिळालेला विषय घेवून जुलै-ऑगस्ट 2017 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेला बसता येईल. या परीक्षेतही नापास झाल्यास मार्च 2018 मध्ये आणि त्यापुढील परीक्षेत बसण्याची संधी मिळेल. मात्र 10 वीची परीक्षा पूर्णपणे उत्तीर्ण झाल्यानंतरच संबंधित विद्यार्थ्याचा 11 वीचा निकाल जाहीर करण्यात येईल.