कत्तलखान्यात बाजारातील गुरे विकण्यास बंदी

प्राण्यांची विक्री, खरेदी करणाऱ्यांना‘शेतकरी’ असल्याचे पुरावे सादर करावे लागणार

नवी दिल्ली,27मे 2017

पाळीव जनावरांचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. गाई, म्हशींसह अनेक प्राण्यांना कत्तलीसाठी यापुढे प्राण्यांच्या बाजारात विकण्यास सरकारने बंदी घातली आहे. पशूवधगृहातील क्रूरता प्रतिबंधक कायदा नियम क्रमांक 2017 नुसार सरकारने हा निर्णय घेतला आहे.

गुरांच्या बाजारात पाळीव प्राण्यांचे हाल होतात. त्यामुळे प्राण्यांचे हाल होवू नये म्हणून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला निर्देश दिले होते. त्यानुसार पर्यावरण मंत्रालयाने प्राण्यांच्या खरेदीविक्रीबाबत नियम कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे प्राण्यांच्या खरेदी विक्रीबाबत संबंधितांना कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. गुरांची खरेदी-विक्री आता शेतकऱ्यांपुरती मर्यादित ठेवण्यात आली असून, गाय, बैल, सांड, म्हैस, रेडा, कालवड, बछडे आणि ऊंट यांचा त्यांच्यात समावेश आहे. या प्राण्यांची विक्री किंवा खरेदी करणाऱ्यांना आपण ‘शेतकरी’ असल्याचे पुरावे व्यवहारावेळी सादर करावे लागणार आहेत.

भाकड गायी आणि वृद्ध बैलांची विक्री करून शेतकरी काही पैसे गाठीशी बांधतात. या कायद्यामुळे त्यांच्या या उत्पन्नावर गदा येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या नव्या निर्णयानुसार प्राण्यांच्या बाजारातील जनावरांना कत्तलखान्यात विकण्यास  मज्जाव करण्यात आला आहे. शिवाय लहान प्राण्यांना विक्रीसाठी आणले जावू नये यावरही लक्ष ठेवण्यात येणार आहे.