रामनाथ कोविंद यांना शिवसेनेचा पाठिंबा

मुंबई, 20 जून 2017/AV News Bureau:

एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. मंगळवारी शिवसेना नेत्यांच्या बैठकीत सगळ्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेवून बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद हे एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असल्याचे जाहीर केले होते. मात्र कोविंद यांच्या नावाला शिवसेनेने सुरूवातीला विरोध केला होता. मात्र अचानक आपला विरोध मागे घेत कोविंद यांच्या नावाला पाठिंबा असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

रामनाथ कोविंद देशासाठी चांगले काम करतील, देशाच्या हिताचे निर्णय घेतली, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

राष्ट्रपतीपदासाठी मोहन भागवत या नावाला आम्ही पसंती दिली होती. ही पसंती आजही कायम आहे. मात्र ते राष्ट्रपतीपदाच्या चर्चेत नसल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणाऱ्या स्वामिनाथन यांच्या नावाला दुसरी पसंती दिली होती. मात्र वाढत्या प्रकृतीच्या कारणावरून त्यांना उमेदवारी देणे शक्य नसल्याचे शाह यांनी आपल्याला सांगितले.शेवटी भाजपने पुढे केलेल्या नावाला पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेना नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.