अंगणवाड्यांमधील मुलांना अंडी पुरवणार

२ वर्षांचा स्वयंम प्रकल्प राबविण्याबाबत मंत्रीमंडळाचा निर्णय

मुंबई, 18 एप्रिल 2017 /AV News Bureau:

राज्यातील ग्रामीण भागात कुक्कूटपालनाच्या उद्योगास प्रोत्साहन देण्याबरोबरच ग्रामीण भागातील मुलांचे कुपोषण रोखण्याच्यादृष्टीने सर्व अंगणवाड्यांमध्ये जाणाऱ्या मुलांना रोजच्या आहारात अंडी पुरविण्यासाठी आणि आदिवासी कुटुंबांसाठी  स्वयंरोजगाराची निर्मिती करण्यासाठी पुढच्या दोन वर्षांसाठी स्वयंम प्रकल्प राबविण्याचा निर्णय आज राज्य मंत्रीमंडळाने घेतला आहे.

  • राज्यातील १६ जिल्हयांमध्ये स्वयंम प्रकल्प राबवणार

स्वयम् प्रकल्प ठाणे, पालघर व रायगड (कोकण विभाग), पुणे (पुणे विभाग), नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, जळगाव, धुळे (नाशिक विभाग), अमरावती व यवतमाळ (अमरावती विभाग), नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर(नागपूर विभाग), नांदेड (लातूर विभाग) या 16 जिल्ह्यांत राबविण्यात येणार आहे.

  • १०४ खासगी पक्षी संगोपन केंद्र स्थापन करणार

या १६ जिल्ह्यांतील एकूण 104 एकात्मिक बाल विकास प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात प्रत्येकी एक युनिट याप्रमाणे 104 खासगी पक्षी संगोपन केंद्रे (मदर युनिट) स्थापन करण्यात येणार आहेत. प्रत्येक युनिटशी  417 लाभधारकांना जोडण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण 43 हजार 368 कुटुंबांना लाभ देण्यात येणार आहे. आदिवासी उपयोजना क्षेत्रातील अंगणवाड्यांतील मुलांच्या आहारात अंड्यांचा पुरवठा करुन कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.