शेतकऱ्यांना तातडीने दहा हजार रुपयांचे कर्ज द्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बॅंकांना आवाहन

मुंबई, 21 जून 2017/AV News Bureau:

सर्व राष्ट्रीयकृत बँका, व्यावसायिक बँका, राज्य सहकारी बँक, जिल्हा सहकारी बँका व अन्य बँकांनी राज्य शासनाने शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून जाहीर केलेले दहा हजार रुपयांचे कर्ज त्वरीत द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

राज्यस्तरीय बँकर्स समितीची विशेष बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

एखादा निर्णय घेतल्यानंतर त्याची तातडीने अंमलबजावणी होणे अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या 10 हजार रुपयांच्या तातडीच्या कर्जपुरवठ्याबाबत बँकांचा पुढाकार महत्त्वाचा आहे.त्यामुळे दहा हजार रुपयांचे तातडीच्या मदत स्वरुपातील कर्ज हे प्रत्येक पीक कर्ज खाते असलेल्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावयाचे आहे. राज्य शासनाची आर्थिक स्थिती मजबूत असल्याने केलेल्या कर्जपुरवठ्याची माहिती शासनाकडे जमा केल्यानंतर तातडीने बँकांना व्याजासह परतावा दिला जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

निश्चलनीकरणानंतर राज्यातील जिल्हा सहकारी बँकातील जुन्या नोटा 30 दिवसांत स्वीकारण्यात येतील अशा स्वरुपाचे पत्र भारतीय रिझर्व्ह बँकेच्यावतीने आजच प्राप्त झाले असल्याने 10 हजार रुपयांचे तातडीचे कर्ज शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकातून लवकरच देण्याची प्रक्रिया होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आर्थिक स्थिती कमकुवत असलेल्या जिल्हा सहकारी बँकांना या कर्ज वितरणासाठी राज्य सहकारी बँक पुनर्वित्तपुरवठा करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.