मल्लिकार्जुन खर्गेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा उभारी घेईल 

महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, ३० ऑक्टोबर २०२२

काँग्रेस सर्वांना संधी देणारा पक्ष असून एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडून देऊन एक इतिहास घडवला आहे. मल्लिकार्जुन खर्गे हे अनुभवी, कुशल प्रशासक व सामान्य जनतेच्या कल्याणासाठी झटणारे नेते आहेत. त्यांच्या प्रदिर्घ अनुभवाखाली काँग्रेस देशात पक्ष पुन्हा एकदा उभारी घेईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारीत कार्यकारिणीची बैठक पक्षकार्यालय टिळक भवन येथे प्रभारी एच. के. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अभिनंदनाचा ठराव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडला .

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष आहे, मल्लिकार्जुन खर्गे यांची लोकशाही पद्धतीने निवडणूक होऊन अध्यक्षपदी निवड झाली आहे. एक कामगार कुटुंबातील व्यक्ती देशातील सर्वात जुन्या पक्षाचा अध्यक्ष होतो ही ऐतिहासिक घटना आहे. काँग्रेस पक्षावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांना हे चोख उत्तर आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्विकारावे असा विनंती प्रस्ताव महाराष्ट्रासह इतर प्रदेश काँग्रेस कमिटींनीही केला होता पण त्यांनी तो नाकारून पक्षातीलच इतर व्यक्तीने अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यावी अशी भूमिका घेतली होती.

बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, खर्गे यांचा काँग्रेस पक्षाचा ब्लॉक अध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. खर्गे यांच्या नेतृत्वाखाली व सोनिया गांधी, राहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाला पुन्हा चांगले दिवस येतील.

अशोक चव्हाण यावेळी म्हणाले की, खर्गे यांना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याची बारकाईने माहिती आहे, त्यांच्या अध्यक्षपदाचा फायदा महाराष्ट्रालाही होईल.

या बैठकीत भारत जोडो यात्रेविषयी चर्चा झाली असून महाराष्ट्रात ही पदयात्रा यशस्वी करून देशात एक वेगळा संदेश देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. ही पदयात्रा महाराष्ट्रात ७ तारखेला प्रवेश करत असून मोठ्या संख्येने सहभागी होऊन पदयात्रा यशस्वी करण्याचे आवाहन उपस्थित नेत्यांनी केले.

========================================