बाद नोटा 20 जुलैपर्यंत आरबीआयमध्ये जमा करा

केंद्र सरकारची बॅंका आणि टपाल कार्यालयांना दुसरी संधी

मुंबई, 21 जून 2017:

चलनातून बाद केलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बॅंकेत भरण्यासाठी केंद्र सरकारने सर्व बॅंका आणि टपालखात्यांना 20 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.मात्र या नोटा 31 डिसेंबर 2016 पर्यंत रिझर्व्ह बॅंकेत का जमा केल्या नाहीत, याचे कारणही संबंधित बॅंका आणि टपाल कार्यालयांना द्यावे लागणार आहे.

गेल्या वर्षी 8 नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर जुन्या नोटा परत घेण्यासाठी केंद्र सरकारने नागरिकांना तसेच विविध आस्थापनांना मुदत दिली होती. मात्र तरीही अनेक बॅंका तसेच आस्थापनांनी आपल्याकडी चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटा रिझर्व्ह बॅंकेत भरलेल्या नाही. त्यामुळे अशा बॅंका तसेच टपाल कार्यालयांसाठी केंद्र सरकारने ही दुसरी संधी दिली आहे.

मात्र कोणत्याही बॅंकेत अथवा टपाल कार्यालयात 30 डिसेंबर 2016 पर्यंत जमा झालेल्या तसेच कोणत्याही जिल्हा सहकारी बॅंकेत 10 ते 14 नोव्हेंबर 2016 या कालावधीत जमा झालेल्या नोटाच अशाप्रकारे रिझर्व्ह बॅंकेत भरता येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. या नोटा जमा करण्यास उशीर का झाला, याचे सबळ कारणही बॅंका आणि टपाल कार्यालयांना द्यावे लागणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.