नेवाळी विमानतळ भूसंपादनाविरोधात शेतकरी आक्रमक

कल्याण- मलंगगड मार्गावर रास्ता रोको आंदोलन

ठाणे, 22  जून 2017/AV News Bureau:  

कल्याण येथील नेवाळी विमानतळासाठी संपादित केलेली जमीन परत मिळविण्यासाठी नेवाळी नाका परिसरात हजारो शेतक-यांनी आज कल्याण- मलंगगड मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. टायर जाळून मलंगगडाकडे जाणारा मुख्य रस्ता बंद केला. या आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी  पॅलेट गनमधून गोळीबार केल्याचे समजते. यामध्ये सहा ते सात शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत.

दुस-या महायुध्दाच्या काळात ब्रिटीश सरकारने धावपट्टीसाठी नेवाळी येथील 1600 एकर जमीन स्थानिक शेतक-यांकडून ताब्यात घेतली होती. स्वातंत्र्यानंतर ही जमीन स्थानिक शेतक-यांना परत करणे आवश्यक होते मात्र केंद् सरकराच्या संरक्षण खात्याने या जमिनीचा ताबा आपल्याकडे ठेवला. ही जमीन नौसेनेकडे देण्यात आली. या जमिनीची माहिती सात बारा पब्लिक डोमेनवर उपलब्ध आहे. केंद्रीय संरक्षण विभागाचे या जमिनीकडे दुर्लक्ष झाले आणि या जागेवर अतिक्रमण झाले. या जागेवर अतिक्रमण होऊ नये यासाठी नौसेनेने संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरू केले आहे. या कामाला शेतक-यांनी विरोध केला आहे. हा विरोध दर्शविण्यासाठी आज शेतक-यांनी डोंबिवली-बदलापूर रस्त्यावर डावलपाडा गावाजवळ  रास्ता रोको केला. दरम्यान जमावाला पांगविण्यासाठी भाल गावात जमावाला पांगविण्यासाठी पॅलेट गनमधून गोळीबार केल्याचे समजते. संतप्त जमावाने पोलिसांची गाडी जाळली आणि पोलिसांवर दगडफेक केली आहे. यामध्ये अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

या जमिनीचे संपादन करण्याबाबत स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकार यांना संपूर्ण माहिती देण्यात आली होती.तसेच राज्य सरकारकडून महसूल विभागाचे अधिकारी आणि पुरेसे पोलिस बळही पुरविण्यात आल्याची माहिती संरक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली.

दरम्यान या भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सध्या  शेतकरी, पोलीस आणि राजकीय नेते यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे.