कामगारांना घरांबरोबरच सामाजिक सुरक्षा पुरवा

मुख्यमंत्र्यांचे कामगार विभागाला निर्देश

मुंबई,  28 जून 2017/AV News Bureau:

नोंदणीकृत बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना 2 जून पासून लागू करण्यात आली आहे. या कामगारांना ‘सर्वांसाठी घरे’ योजनेच्या माध्यमातून घरे उपलब्ध करुन देण्याबरोबरच असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कामगार विभागाला दिले.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या कामकाजाचा आज मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे कामकाज गतिमान, पारदर्शक करण्याकरिता मंडळाच्या कामकाजाची एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित करण्यात येत आहे. याबाबतचा प्रस्ताव येत्या 15 दिवसात निश्चित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

  • बांधकाम कामगारांची नोंदणी वाढवा

महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांची नोंदणी संख्या वाढविण्यासाठी व त्यांना कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी अधिकाधिक विभागाने लक्ष देणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 15 मार्च 2011 च्या आदेशानुसार राज्य शासनाकडील सर्व बांधकाम आस्थापनांची नोंदणी करणे आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, म्हाडा (गृहनिर्माण), सिडको (नगरविकास), एमआयडीसी (उद्योग) तसेच बांधकाम क्षेत्राशी संबंधित सर्व विभागांनी सक्रिय सहभाग घेणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.