चिक्की घोटाळा- ‘मंत्र्याविरोधात न्यायालयीन लढाई ’

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांचा इशारा

मुंबई, 22 डिसेंबर 2016 /AV News Bureau :

राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना चिक्की घोटाळ्याप्रकरणी एसीबीने क्लीनचिट दिली. मुख्यमंत्री भ्रष्टाचाऱ्यांचे संरक्षण कसे करतात त्याचे हे उदाहरण आहे. एसीबीने मुंडे यांना क्लीनचिट दिली असली तरी हे प्रकरण कोर्टात सुरू आहे. विरोधक या नात्याने आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करुन न्यायालयीन लढाई लढू व या भ्रष्ट मंत्र्यांना घरी पाठवू अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

राज्यातील २२ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मुख्यमंत्री सुरुवातीपासूनच सर्वांना क्लीनचिट देत आले आहेत. पंकजा मुंडे यांच्या प्रकरणातही विरोधकांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या आधारावर एसीबीने महिला व बाल कल्याण विभागाकडून अहवाल मागितला होता. महिला व बालकल्याण विभागाच्या सचिवांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे पंकजा मुंडे यांना आज एसीबीने क्लीनचिट दिली आहे. या प्रकरणात एसीबीने कोणतीही चौकशी केली नसल्याचे स्पष्ट दिसून येते. मुख्यमंत्री आपल्या भ्रष्ट मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत हेही यातून दिसून येते.

निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा घाट

येत्या २४ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे भूमिपूजन होणार आहे. आगामी मुंबई, ठाणे, पुणे या महानगरपालिका तसेच राज्यातील आगामी जिल्हा परिषदांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजप पक्षाला फायदा होण्यासाठीच राज्य सरकारचा हा प्रयत्न आहे. वास्तविक स्मारकाला केंद्रीय पर्यावरण खात्याची परवानगी अद्याप मिळालेली नाही तसेच कामासाठी निविदा काढल्या गेल्या नाहीत. स्मारकाचा आराखडाही अंतिम झालेला नाही. फक्त शिवाजी महाराजांच्या नावावर निवडणूकीत मताचा जोगवा मागण्यासाठी भूमिपूजन केले जात असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी सरकारवर केला आहे.

बिहार राज्याच्या निवडणुकीवेळी इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले होते. भूमिपूजनानंतर आतापर्यंत इंदू मिलच्या स्मारकासाठी काहीही ठोस हालचाली झालेल्या नाहीत. राज्य सरकारतर्फे बिहार निवडणुकीची पुनरावृत्ती आगामी निवडणूकीत करण्याचा केविलवाणा प्रयत्न होताना दिसत आहे, असेही मलिक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.