बांधकाम कामगार व कुटुंबासाठी ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’

मुंबई,15 जून 2017/AV News Bureau:

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत बांधकाम कामगार व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांना आता आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ लागू करण्यात आली आहे.

बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट करून घेण्याबाबत कामगार विभागाने 21 सप्टेंबर 2016 आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने 2 जून 2017 रोजी आदेश काढले आहेत. या शासन निर्णयानुसार आता बांधकाम कामगारांना 2 जून 2017 पासून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.

सदर योजनेचा लाभ घेताना

  • लाभ घेतेवेळी नोंदीत बांधकाम कामगारांची नोंदणी जीवित असणे अनिवार्य आहे.
  • कुटूंबासाठी लाभ घेण्याकरीता मंडळाच्या ओळखपत्रामध्ये कुटुंबाचा तपशील नमूद असणे अनिवार्य आहे.
  • बांधकाम कामगारांना देण्यात येणारे नोंदणी प्रमाणपत्र/ ओळखपत्र हा विमा संरक्षण देण्याकरीता पुरावा म्हणून पुरेसा समजण्यात येईल.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मिळणारे लाभ

  • या योजनेमध्ये कर्करोग, बालकांवरील उपचार, वृद्धांवरील उपचार, हीप अँड नी रिप्लेसमेंट, सिकलसेल, ॲनिमिया, डेंग्यू, स्वाईन फ्लू इ. साठी नवीन उपचारांचा समावेश करून रक्त विकारशास्त्र या सेवेसह 31 विशेषज्ञ सेवांतर्गत एकूण 1100 प्रोसिजर्सचा समावेश व 127 पाठपुरावा सेवांचा समावेश करण्यात आला आहे.
  • 111 प्रोसिजर्स शासकीय रुग्णालयांसाठी तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांकरीता राखीव ठेवण्यात आलेले आहे. सदर प्रोसिजर्सची यादी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 4 ऑगस्ट 2016 च्या शासन आदेशाच्या परिशिष्टामध्ये नमूद करण्यात आली आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना रुग्णालयांमध्ये नियुक्त ‘आरोग्य मित्र’ यांची मदत घेता येईल.
  • शासन आदेश शासनाच्या maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.