‘स्वाईन फ्ल्यू’ रुग्णांसाठी केईएममध्ये विशेष कक्ष

मुंबई, 30जून 2017/AV News Bureau: 

मुंबईत फैलावणाऱ्या स्वाईन फ्ल्यु आजाराच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या तसेच शासनाच्या रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांकरीता विलगीकरण कक्ष सुरू करण्यात येणार आहे. त्यापैकी के.ई.एम. रुग्णालयात विलगीकरण कक्ष सुरु आला आहे.

आरोग्यमंत्री दिपक सावंत मागील तीन दिवसांपासून मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयांना भेटी देत आहेत. आतापर्यंत त्यांनी कस्तुरबा संसर्गजन्य रुग्णालय, के.ई.एम. रुग्णालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयांना आरोग्यमंत्र्यांनी भेटी देवुन रुग्णांची विचारपूस करीत टॅमीफ्ल्यु गोळ्यांचा साठा, विलगीकरण कक्षाच्या सुविधा यांचा आढावा घेतला.

आज आरोगयमंत्र्यांनी कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयाला भेट दिली. महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील खाजगी डॉक्टर व रुग्णालयांची बैठक घ्यावी. खाजगी रुग्णालय व डॉक्टरांनी स्वाईन फ्ल्युच्या आजाराचे लक्षण व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देणारा फलक लावावा यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी संनियंत्रण करावे, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

100 पेक्षा अधिक ताप, सर्दी खोकला, घशाची खवखव अशी लक्षणे असतील तर अशा वेळेस डॉक्टरांनी एक दिवसाची वाट बघून रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा न झाल्यास त्याला ऑसेलटॅमीवीर गोळी सुरु करावी. विशेष म्हणजे केंद्राच्या पथकाने याला सहमती दर्शविली आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

मधुमेह, उच्च रक्त दाब तसेच गरोदर माता अशा अतिजोखमीच्या गटाकडे विशेष लक्ष द्यावे. पावसाळ्याचा हंगाम लक्षात घेता जनजागृतीवर भर द्यावा. खासगी डॉक्टरांच्या कार्यशाळा घेण्यात याव्यात. यासाठी महत्त्वाचा दुवा असलेल्या इंडियन मेडिकल असोशिएशनच्या संपर्कात राहावे, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

जुलै महिन्यापासून प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला गती द्यावी. शाळांमधुन विद्यार्थ्यांना स्वाईन फ्ल्यूबाबत जाणीव जागृतीचे धडे द्यावेत, असेही आरोग्यमत्र्यांनी यावेळी सांगितले.