आज रात्री सेंट्रल हॉलमध्ये GST सोहळा

मध्यरात्रीपासून देशभरात एकच करप्रणाली लागू होणार

नवी दिल्ली, 30 जून 2017:

वस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटी आज मध्यरात्रीपासून संपूर्ण देशात लागू होणार आहे. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या प्रमुख उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री जीएसटीची औपचारिक घोषणा करणार आहेत. मात्र काँग्रेससह विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, जीएसटी करप्रणाली सर्वसंमतीने लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे विरोधकांनी आपल्या निर्णयावर पुन्हा विचार करावा, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेठली यांनी विरोधकांना आवाहन केले आहे . जीएसटीमुळे देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेला नवीन वळण लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जीएसटी लागू करण्याबाबतची घोषणा करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सेंट्रल हॉलमध्ये नवीन कारपेट टाकण्यात आली आहेत. तसेच नवीन साउंड सिस्टीमही लावण्यात येणार आहे. हा कार्यक्रम रात्री 11 च्या सुमारास सुरू होणार आहे. त्यानंतर मध्यरात्री घंटा वाजवून जीएसटीची औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला सुमारे एक हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यामध्ये चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा, ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर, आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल आणि दोन माजी गव्हर्नर बिमल जालान आणि वाय वी रेड्डी उपस्थित राहणार आहेत. मात्र माजी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे समजते.

काँग्रेसने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्यामुळे माजी पंतप्रधान मनमोहन सिंगदेखील उपस्थित राहणार नाहीत. राष्ट्रीय जनता दलनेही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकाल आहे.  तर जनता दल युनायटेडने सेंट्रल हॉलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचा निर्णय घेतला आहे. आपण तसेच आपल्या पक्षाने पहिल्यापासून जीएसटीला पाठिंबा दिल्याचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी सांगितले.