अलिबाग नगरपालिकेच्या शाळांमध्ये पाणी घुसले

बोर्ली-मुरुड,अमुलकुमार जैन,18 जुलै 2017:

गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील नगरपालिकेच्या उर्दू आणि मराठी शाळांमध्ये पाणी घुसले. त्यामुळे मुलांना पाण्यातूनच वाट काढत शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. याप्रकरणी संबंधिक विभागाने तातडीने लक्ष घालून शाळांमध्ये घुसणारे पाणी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

पावसाळ्यापूर्वी योग्य ती डागडुजी आणि दुरूस्तीची कामे करण्याची गरज होती. मात्र ती योग्य प्रकारे न झाल्यामुळे पावसाळ्यात शाळांमध्ये पाणी घुसू लागले आहे. त्यामुळे शिक्षणाच्या ओढीने शाळेत येणाऱ्या लहान विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेत व्हऱ्यांड्यातील पाण्यातूनच वाट काढावी लागत असल्याचे दिसून येते. सतत पाण्याच्या संपर्कात राहिल्यास मुलांमध्ये आजार बळावण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा शिक्षण विभागाने तातडीने याप्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 

संबंधित शाळेच्या परिसरात मातीचा भराव केल्यामुळे पाणी शाळेच्या व्हरांड्यात शिरले आहे.मात्र कोणत्याही वर्गात पाणी गेलेले नाही, असे शाळेच्या शिक्षकांनी कळविले आहे.

राजेंद्र बोरकर. लेखनिक,शिक्षण विभाग, अलिबाग नगरपालिका.