लाचप्रकरणी सिडकोच्या सहनिबंधक शरद जरे विरोधात गुन्हा

नवी मुंबई, 20 सप्टेंबर 2017/AV News Bureau: 

सोसायटीचे नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी 3 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सहकारी संस्था सिडकोचा सहनिबंधक शरद पांडुरंग जरे याच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. शरद पांडुरंग जरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे नवी मुंबईत एकच खळबळ उडाली आहे.

नवी मुंबई, पनवेल परिसरातील गृहनिर्माण संस्थांसंबंधित प्रकरणे सीबीडी बेलापूर येथील रायगड भवनमधील सहकारी संस्था, सिडको कार्यालयात येत असतात. या कार्यालयात शरद पांडुरंग जरे हे अधिकारी सहनिबंधक म्हणून कार्यरत आहेत. खारघर, सेक्टर 20 मधील जलवायुविहार सोसायटीत  राहणाऱ्या तक्रारदाराने सोसायटीचे नोंदणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी सिडको कार्यालयात कागदपत्रांची फाइल दाखल केली होती. मात्र नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी सहनिबंधक शरद पांडुरंग जरे यांनी अनधिकृत एजंट ससाणेच्या माध्यमातून 3 लाख रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नवी मुंबईकडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सहनिबंधक शरद पांडुरंग जरे यांनी 3 लाख रुपये मागितल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

याप्रकरणी सहनिबंधक शरद पांडुरंग जर आणि एजंट ससाणे या दोघांविरोधात मंगळवारी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्रमांक 0165/2017 लाचलुचपत प्रतिबंधक कायदा सन 1988 चे कलम 8,10 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, नागरिकांनी भ्रष्टाचारसंबंधी तक्रार करण्यासाठी 022-27833344 या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक रमेश चव्हाण यांनी केले आहे.