तस्करीमुळे २७ लाख महिला देहविक्री,अवैध व्यवसायात

महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर

‘महिला तस्करी’ विषयावर २७,२८ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय परिषद

मुंबई, 20 जुलै 2017/AV News Bureau:

देशभरात सुमारे २७ लाख महिला या देहविक्रीसह इतर अवैध व्यवसायात ढकलल्या गेल्या आहेत. महिलांच्या तस्करीतून दरवर्षी साधारण ३० हजार महिला या अवैध क्षेत्रात ढकलल्या जातात. हे रोखण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि इंटरनॅशनल जस्टीस मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने २७ व २८ जुलै रोजी मुंबई येथे ‘महिलांची तस्करी’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. जुहू येथील जे.डब्ल्यू. मेरिएट येथे ही परिषद होणार आहे.

तस्करीसारखे कृत्य अत्यंत संघटित आणि नियोजनबध्द पध्दतीने कोणत्याही सीमेचे बंधन न बाळगता राबविले जात असल्यामुळे या गोष्टीची चर्चा जागतिक पातळीवर होणे आवश्यक झाले आहे. या परिषदेत मानवी हक्क, बाल हक्क, महिलांचे अधिकार आदी विषयात कार्य करणारे २० हून अधिक देशातील साधारण १०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. राज्यातील तसेच देशातील संबंधित मंत्री, विविध आयोगांचे अध्यक्ष, सचिव या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, तज्ञ परिषदेत सहभागी होणार आहेत. परिषदेत २ दिवस या विषयावर चर्चा होऊन ही अमानवी प्रथा रोखण्यासाठी एक फोरम तयार करण्यात येईल. तसेच विविध उपाययोजना सुचविण्यात येतील, अशी माहितीही रहाटकर यांनी दिली.

या परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्य सचिव सुमित मल्लिक, तेलंगणाचे पोलिस आयुक्त महेश भागवत, राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर, मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर, गोव्याचे डायरेक्टर जनरल मुक्तेश चंदेर, गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा, आयटीपीएचे माजी दंडाधिकारी स्वाती चौहान हे या परिषदेत संवाद साधणार आहेत.

या चर्चासत्रात भाग घेणाऱ्या प्रमुख वक्त्यांमध्ये आयजेएमचे मुख्य अधिकारी गॅरी हॉगेन, घानाच्या समिरा बाऊमिया, फिलिपिन्स पोलीस दलाच्या लिबोरिओ कॅराबॅक्कन, केनिया पोलीस दलाच्या बाल संरक्षण विभागाच्या अधिक्षक ग्रेस एनजोकीएन्डीरांगो, बोलिव्हीयाच्या पोलीस दलाचे कर्नल जॉनी अॅकग्वीलेरा, कंबोडियाच्या आंतरराष्ट्रीय मायग्रेशन विभागाचे मेंगलांगकेंग, ब्राझीलचे लोकप्रतिनिधी डेपुटाडो कार्लोस बेझेरा, फिलिपिन्सच्या मानवी तस्करी विरोधी विभागाच्या प्रमुख जेनेट फ्रांसिस्को,थायलंडचे अँटी ट्रॅफिकिंग इन पर्सन्स डिव्हिजनकडून लेफ्टनंट कर्नल अरूण प्राँफन, रिस्पॉन्सिबल फॉर सोर्सिंग ऑपरेशन्स वॉलमार्टचे सुनील जेकब, प्रज्वलाच्या डॉ. सुनीता कृष्णन हे उपस्थित राहणार आहेत.