शांतता क्षेत्रात फटाक्यांवर बंदी

नागरिकांनी नियंत्रण कक्षात तक्रार करण्याचे पोलिसांचे आवाहन

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई,6 सप्टेंबर 2018:

रूग्णालये, शैक्षणिक संस्था, धर्मिक स्थळे, न्यायालय यांसारख्या शांतता क्षेत्रामध्ये ध्वनीक्षेपक (लाऊडस्पिकर), संगीत वाद्य, फटाके इत्यादी वाजविण्यास संपूर्णपणे बंदी करण्यात आली असून या नियमांचे उल्लंघन होत असल्यास नागरिकांनी मुख्य नियंत्रण कक्षातील 100 क्रमांक तसेच 7738144144/7738133133 या क्रमांकावर एसएमएस व्दारे तक्रार करण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.

बृहन्मुंबईत शांतता क्षेत्र वर्गीकृत करण्यात आली आहेत. शांतता क्षेत्रे ही 24 तास म्हणजेच दिवस व रात्रीसाठी शांतता क्षेत्र घोषित केले असल्याने या क्षेत्रामध्ये ध्वनीक्षेपक फटाके इत्यादी वाजविण्यास संपूर्णपणे बंदी आहे.

शांतता क्षेत्र वगळून इतर ठिकाणी  आवश्यक परवाना घेवून सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक, संगीत वाद्य यांचा वापर आवाजाची ठरविण्यात आलेल्या पातळीच्या उल्लंघनाशिवाय करता  येणार आहे.

कायद्यानुसार आवाजाची मर्यादा औद्योगिक क्षेत्रात दिवसा 75 डेसिबल व रात्री 70 डेसिबल, विपणन क्षेत्रात दिवसा 65 व रात्री 55 डेसिबल, रहिवासी क्षेत्रात दिवसा 55 व रात्री 45 डेसिबल आणि शांतता क्षेत्रात 50 डेसिबल व रात्री 40 डेसिबल अशी ठरविण्यात आली आहे.