पर्यटकांच्या सुरक्षेसाठी टुरिझम पोलीस

मुंबई, 20 जुलै 2017/AV News Bureau:

राज्यातील सागरी किनारी जिल्ह्यामध्ये पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तसेच त्यांना सहाय्य व्हावे, यासाठी टुरिझम पोलिस ही संकल्पना राबविण्यासाठी आराखडा तयार करावा. तसेच सागरी किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी मॉडेल तयार करण्याचे निर्देश गृह (ग्रामीण) राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी आज दिले.

सागरी किनाऱ्यावरील सुरक्षा व्यवस्थेचा केसरकर यांनी आढावा घेतला. राज्याच्या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात देशविदेशी पर्यटक येत असतात. या पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यायला हवे. त्यासाठी सागरी किनारपट्टी पोलीसांना लाइफ जॅकेट, बोटी आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. सागरी बीचवर येणाऱ्या पर्यटकांना सहाय्य करण्यासाठी  व त्यांच्या सुरक्षेसाठी टुरिझम पोलीस ही संकल्पना राबविण्यात यावी. यासंबंधी या पोलिसांना विशेष कौशल्य प्रशिक्षण कोकण ग्रामीण विकास पर्यटनाच्या माध्यमातून देता येईल. त्याबाबत स्थानिक पातळीवरील आराखडा तयार करावे. सागरी पोलिसांना समुद्रामध्ये 12 मैलपर्यंत कारवाई करण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार योग्य ती कार्यवाही करावी. तसेच छोटे आणि मोठे मच्छिमार यांच्यासंदर्भात योग्य ती काळजी घ्यावी, असे निर्देश केसरकर यांनी यावेळी दिले.

किनारपट्टीवर तसेच समुद्रामध्ये टेहळणीसाठी ग्राऊंड पोजिसनिंग सिस्टीम (जीपीएस) यंत्रणेवरील प्रणाली वापरण्यासाठी आराखडा तयार करावा, असेही केसरकर यांनी सांगितले.

सागरी किनाऱ्यावर गुन्हे घडू नयेत, गुन्हेगारी विषयक घटनांवर, अंमली पदार्थ माफिया यांच्यावर पोलिसांनी लक्ष ठेवावे व त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी. तसेच पर्यटकांच्या दृष्टीने सागरी किनारा सुरक्षेसंदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्याने एक मॉडेल तयार करावे. हे मॉडेल इतर जिल्ह्यांनाही लागू करण्यात येईल, असेहीकेसरकर यांनी सांगितले.