महिला, मुलांच्या हक्कांसाठी लढणारी ताई

रेणुका कड, औरंगाबाद, महाराष्ट्र

आपला समाज प्रगत होत चालला आहे, असे आपण नेहमी म्हणतो. मात्र जेव्हा महिला, मुली आणि लहान मुलांचे प्रश्न समोर येतात. तेव्हा आपण खरोखरच प्रगत समाजात राहतो का, असा प्रश्न आपल्या मनात सातत्याने डोकावू लागतो. महिला, अल्पवयीन मुली, मुले यांच्यावरील अत्याचार आणि छळवणूकीच्या घटना जेव्हा कानावर पडतात, तेव्हा समाजमन किती बोथट झाले आहे, याचा भयंकर अनुभव येतो. समाजातील हीच बोथटता एका तरुणीला अस्वस्थ करीत असते. याच अस्वस्थतेतून ती कधी मराठवाड्यातील एकल महिलांच्या प्रश्नावर आवाज उठवत असते. कधी कोकणातील महिला मच्छिमारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करते तर कधी ती खेडोपाडयात बालपण होरपळलेल्या निरासगस मुलांसाठी ताई होवून आधार बनते. अनेक महिलांची, मुलांची ताई असलेली अवघ्या चाळीशीतील ही तरुणी म्हणजे रेणुका कड.  सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ती म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि मुंबईपासून थेट सातासमुद्रापार परदेशात जाऊन महिला, मुलांवर होणाऱ्या अन्यायाबाबत सातत्याने आवाज उठविण्याचे काम करीत असते.

एखाद्या व्यक्तीच्या अशा वागण्याचे मूळ त्याच्या गत आयुष्यात दडलेले असते. रेणुकाच्या बाबतीतही असेच काहीसे घडले. कौटुंबिक कारणांमुळे लग्नानंतर  काही काळातच आईला पुन्हा माहेरी जावे लागले. त्यावेळी आपल्या समाजात महिलांना किती मोकळीक दिली जाते आणि त्यांच्या विचार स्वातंत्र्यावर किती निर्बंध असतात, याची जाणीव तेव्हा झाली. आमचे कुटुंब म्हटले तर आई, मोठा भाऊ, मोठी बहिण आणि मी असे चौघेजण. माझ्या जन्मापासून ते 2004 पर्यंत आजी-आजोबांच्याच घरात राहीलो. त्या घरात आजी आजोबा, दोन मामा – मामी, त्यांची मुलं अशी तब्बल 15 माणसे. त्या कुटुंबात आई रहायला आली. माहेरी आल्यानंतर तिने 17 नंबरचा फॉर्म भरला आणि दहावीची परिक्षा दिली. लग्न झालेली मुलगी माहेरी आल्यावर तो सगळ्यांसाठी चर्चेचा विषय. अशा प्रचंड तणावाखाली ती दहावी पास झाली. दहावीनंतर टाइपिंग शिकली. टाइपिंगच्या परिक्षेत तर ती औरंगाबाद जिल्ह्यात पहिली आली होती. पाटबंधारे खात्यात क्लार्क म्हणून ती नोकरीला लागली. नोकरीनंतर आजोबांनी आम्हाला स्वतंत्र राहू  दिलं नाही. शिक्षण, आर्थिक स्थिरता असूनही तिला ते अनुभवता आलं नाही. या सगळ्या घडामोडी आम्ही जवळून पाहिल्या होत्या. तसेच काहीसे अनुभव आमच्याही वाट्याला आले. त्या परिस्थितीत आम्ही भावंडदेखील घडत गेलो.

आम्ही काय शिकायचं, कुठल्या शाळेत जायचं याबाबतचा  निर्णय मोठ्यांनीच घेतला. त्यानुसार  सातवीपर्यंतचे शिक्षण त्यावेळी असलेल्या सावित्रीबाई फुले शिक्षण योजनेतून झाले. त्यापुढचे शिक्षण इतरांकडून मागून आणलेल्या पुस्तकांच्या मदतीने झाले आणि कॉलेजचे शिक्षण घरी राहूनच पूर्ण केले. फक्त एमएसडल्बूचे (मास्टर इन सोशल वर्क) शिक्षण कॉलेजात जाऊन घ्यावं लागलं. मात्र ते घरी कळू नये यासाठी खूप आटापिटा करावा लागला. एका ठिकाणी पार्ट टाइम जॉब करीतच शिक्षण घ्यावं लागलं. तसं पाहिलं तर एकीकडे आर्थिक सुबत्ता होती. पण तिचा उपयोग आमच्या करता नव्हता. कारण आम्ही आजोबांना काही बोलूही शकत नव्हतो.  बोललो तर जे सुरु आहे तेही हातच जाईल हि भीती वाटायची. असे करत २००३ पर्यंत सगळे दिवस गेले.

एमएसडब्लूच्या शिक्षणानं अनेक गोष्टी समजू लागल्या. मनातील भिती भिरकावून देण्याची ताकद आली. आणि हळूहळू कामाला सुरूवातही केली. लहान मुलांचे प्रश्न आणि त्यांची मानसकिता अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येत होती. त्यामुळे सामाजिक क्षेत्राशी संबंधित शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपुलकी  नावाच्या सामाजिक संस्थेसोबत काम करण्याची संधी मिळाली.

renuka with kids

 

२००३ मध्ये औरंगाबाद चाईल्डलाईन या भारत सरकारच्या महिला व बाल कल्याण मंत्रालयातंर्गत चालणाऱ्या प्रकल्पात काम केले. तीन वर्षे तिथे काम केल्यानंतर मला माझ्या कामाची दिशा मिळाली आणि कामाचा मुख्य गाभा हा महिला आणि मुलांचे प्रश्न असाच राहीला आहे.चाईल्डलाईन हा ०-१८ वर्ष वयोगटातील बालकांसाठी राष्ट्रीयपातळीवर चालणारा प्रकल्प आहे.  हा प्रकल्प १०९८ ह्या टेलीफोन हेल्पलाईन मार्फत चालवला जातो.  १०९८ हा चार आकडी नंबर खास मुलांना लक्षात राहण्यास सोपा जावा म्हणून घेतला आहे.  कोणतेही मुल असो ते सहजपणे १ ते १० अंक म्हणू शकते. ही हेल्पलाईन २४ तास आणि ३६५ दिवस सुरु असते.  या हेल्पलाइनच्या माध्यमातून हरवलेले किंवा पळून आलेले मूल, आजारी असलेले मूल, अनाथ मूल / टाकून किंवा सोडून दिलेले मूल, भावनिक सहाय्य आणि मार्गदर्शनाची गरज असलेले मूल, शारीरिक आणि लैगिक अत्याचाराला बळी पडलेले मूल, मानवी अनैतिक वाहतुकीच्या जाळ्यात अडकलेले मूल, बाल कामगार, बाल विवाह,रस्त्यावर राहणारे मूल, विकलांग मूल, व्यसनाच्या आहारी गेलेले मूल अशा अनेक प्रकारच्या अडचणीत सापडलेल्या मुलांना चाइल्डलाइन मदत करते.

इथे काम करत असताना निवासी संस्थामधील बालकांचे होणारे लैगिक शोषण हे प्रकरण उघडकीस केले होते. अकोला येथील सर्कसमध्ये काम करणाऱ्या मुलांचे शोषण या विषयावर काम करताना तेव्हाचे अकोल्याचे जिल्हाधिकारी श्री श्रीकर परदेशी यांच्यासोबत समन्वय साधून सर्कस मधील एकूण १९ बालकांची सुटका केली होती.  औरंगाबादच्या एका मसाला तयार करण्याच्या कंपनीतून ४० बालकांची सुटका करण्यात आली होती.

यानंतर नोव्हेंबर २००६ ते एप्रिल २०१३ पर्यंत औरंगाबाद पोलीस अधीक्षक कार्यालयात टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा महिला व मुलांकरिता सहाय्य कक्ष या प्रकल्प चालतो त्या ठिकाणी कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांसाठी समुपदेश आणि कायदेशीर मदत यासाठी काम केले.

renuka group ph

आज आई सेवानिवृत्त आहे.  भाऊ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नोकरी करतो तसेच बास्केटबॉल आणि कॉर्फबॉलचा खेळाडू  आहे. शिवाय  महाराष्ट्र टीमचा कोच म्हणून कार्यरत आहे.  बहिण दुबईला असते.  तिथे स्वत:ची लीगल फर्म आहे. आम्ही भावंडं जमेल तशी जीवनात स्थिर होण्याचा प्रयत्न केला. आमच्यासाठी आईने खूपच खस्ता खाल्ल्या. माझ्या जीवनावर तिचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळेच महिलांचे प्रश्न, मुलांचे प्रश्न मला स्वत:ला खूप जवळचे वाटतात.

मी २०१३ ते आज पर्यंत कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि विकास अध्ययन केंद्र या संस्थेसोबत काम करते.  ज्यात कामाचा मुख्य विषय कोकणातील पारंपारिक मच्छिमार आणि त्याचा उपजीविका आणि अन्न सुरक्षेचा हक्क, महिला मच्छिमार आणि त्याच्या समस्या, सायबर क्राईम आणि महिला, सायबर क्राईम आणि किशोरवयीन मुले-मुली, आरोग्य, मराठवाड्यातील दुष्काळ, मराठवाड्यातील एकल महिला आणि त्यांचे प्रश्न, एकल महिलांची मुले आणि त्याच हक्क, अन्न सुरक्षेचा हक्क, मुले मोठी होताना हा किशोरवयीन मुलांसाठीचा प्रशिक्षण कार्यक्रम, शहरीकरण, शहरातील असंघटीत कामगार आणि त्याची अन्न सुरक्षा यावर काम करत आहे. भविष्यात पुढे काम करत असताना एकल महिला आणि त्याच्या मुलांचे हक्क, एकल महिलांचा  घराचा हक्क, महिला व बाल हक्क, उपजीविकेचा आणि अन्न सुरक्षेचा हक्क आणि सायबर क्राईम याविषयावर काम करेल.

Emai- Siddharth@aviratvaatchal.com