वर्तमानपत्र गुंडाळलेले अन्नपदार्थ का खावू नये 

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 1 ऑक्टोबर 2023
आपल्या दैनंदिन जीवनात एखाद्या दुकानातून अथवा फेरीवाल्याकडून खाद्यपदार्थ काही वेळा वर्तमानपत्रात बांधून खाण्यासाठी दिले जातात. विशेषतः रस्त्यावर तयार होणारे खाद्यपदार्थ बांधण्यासाठी विक्रेत्यांकडून वर्तमानपत्राचा सर्रास वापर केला जातो.  वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ बांधून देणे ही एक सामान्य गोष्ट आहे. मात्र वर्तमानपत्राच्या कागदात साठवलेले अन्न खाल्ल्याने तुम्ही कर्करोगासारख्या अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता याबाबत आपण गांभिर्याने विचार करीत नाही.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने अलीकडेच एक सूचना जारी केली आहे ज्यानुसार वृत्तपत्रात खाद्यपदार्थ पॅकिंग, सर्व्ह करणे किंवा साठवणे आरोग्यास गंभीर हानी पोहोचवू शकते. एफएसएसआयने सर्व खाद्य विक्रेत्यांना खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात बांधून न देण्याचा  सल्ला दिला आहे.  वर्तमानपत्रात दिलेले किंवा पॅक केलेले अन्न खाल्ल्याने आरोग्याला नुकसान होऊ शकते. याचे कारण म्हणजे वर्तमानपत्र छापण्यासाठी वापरल्या जाणार्‍या शाईमध्ये अनेक धोकादायक रसायने असतात, जे अन्नासोबत आपल्या शरीरात प्रवेश करून अनेक गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतात.
जर तुम्ही वृत्तपत्रात गुंडाळलेले अन्न जास्त दिवस खात असाल  तर कर्करोगासारख्या घातक आजाराचा धोकाही वाढू शकतो. तेलात तळलेले अन्न वर्तमानपत्रावर ठेवलेले असेल आणि असे अन्न तुम्ही खात असाल तर वर्तमानाची शाई तेलात अडकून अन्नाला शरीरात जाते आणि तुम्हाला पचनाशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. याशिवाय वर्तमानपत्रात गुंडाळल्यामुळे अन्नाचा दर्जाही खराब होतो ज्यामुळे आपल्या आरोग्याला धोका निर्माण होतो. याशिवाय वृत्तपत्रात गुंडाळल्यामुळे अन्नाचा दर्जाही खराब होतो ज्याचा परिणाम आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवरही होतो.
वर्तमानपत्र छापण्यासाठी वापरल्या जाणार्‍या शाईमध्ये शिसे आणि जड धातूंसह इतर अनेक रसायने असतात, ज्यामुळे अन्न दूषित होऊ शकते. त्याच वेळी, वर्तमानपत्रांचे वितरण केव्हा केले जाते, ते कुठे आणि कसे ठेवले जाते, या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान वृत्तपत्रे अनेक जीवाणू आणि विषाणूंच्या संपर्कात येऊ शकतात. आणि या वर्तमानपत्रावर अन्नपदार्थ ठेवल्यास त्याचा थेट संपर्क अन्नाशी येवून आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे कोणताही अन्नपदार्थ वर्तमानपत्राशी संपर्कात येणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.  तसेच दुकानादारांनाही वर्तमानपत्रात अन्नपदार्थ बांधून न देण्याची सूचना करावी. कारण शेवटी प्रश्न आपल्या सगळ्यांच्या आरोग्याचा आहे.
========================================================
 इतरही बातम्यांवर दृष्टीक्षेप
========================================================

 ========================================================