‘नवी मुंबई महापौर श्रीगणेश दर्शन स्पर्धा -2017’

नवी मुंबई, 2 ऑगस्ट 2017/AV News Bureau:

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत ‘नवी मुंबई महापौर सार्वजनिक श्री गणेश दर्शन स्पर्धा-2017’ आयोजित करण्यात येणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व संस्था/मंडळे यांनी 20 ऑगस्टपर्यंत जवळच्या विभाग कार्यालयात स्पर्धा प्रवेशिका दाखल कराव्यात,असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

स्पर्धा सहभागासाठी मंडळांनी हे करावे

  • स्पर्धा सहभागाकरीता संस्था / मंडळाची नोंदणी मा. धर्मादाय आयुक्तांकडे झालेली असणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत नोंदणी प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत जोडावयाची आहे.
  • गणेशोत्सवासाठी मंडप घातलेला असल्यास, नवी मुंबई महानगरपालिकेची रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे.
  • या व्यतिरिक्त अधिकृत वीज कनेक्शनची परवानगी, अग्निशमन विभागाची परवानगी तसेच पोलीस यंत्रणेची ध्वनीक्षेपक वापर व इतर कायदा व सुव्यवस्था बाबींविषयक परवानगी घेणे आवश्यक आहे.

इको फ्रेंडली गणेश मूर्तीला प्राधान्य

  • या वर्षीच्या गणेशोत्सवातून पर्यावरणशीलतेला प्रोत्साहन देण्याची महानगरपालिकेची भूमिका असून शाडूच्या मातीच्या अथवा इकोफ्रेंडली साहित्याच्या मूर्ती, सजावटीमध्ये इकोफ्रेंडली साहित्याचा वापर तसेच उत्सव कालावधीत पर्यावरणपूरक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करणा-या मंडळांना प्राधान्य दिले जाईल.
  • सामाजिक सलोखा वाढावा तसेच सांस्कृतिक मूल्यांची जपणूक व्हावी अशा प्रकारचे सादरीकरण देखाव्यातील विषयांत असावे.
  • स्पर्धेच्या परीक्षणामध्ये कलात्मकतेसोबत उद्देशाचाही विचार प्रकर्षाने केला जाईल.

परीक्षकांचे प्राधान्य

  • स्पर्धापरीक्षण करताना पर्यावरणशील (Eco-Friendly) मूर्ती – सजावट व उपक्रम आयोजन, सजावट / देखाव्यातील कलात्मकता तसेच समाजप्रबोधनात्मक संदेश मांडणी, परिसर स्वच्छता व टापटीप, शिस्तबध्दता, निधी विनियोग पध्दती, उत्सवामधील अनुषंगिक शैक्षणिक वसामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन, रोषणाई व इतर बाबींमध्ये जाणवलेल्या विशेष बाबी आदी गोष्टी विचारात घेतल्या जाणार आहेत.

चार विभागात प्रत्येकी ५ पारितोषिके

  • स्पर्धा परीक्षणामधून सर्वोत्कृष्ट देखावा, विषयास अनुरूप समाजप्रबोधनात्मक नाविन्यपूर्ण सजावट, सर्वोत्कृष्ट आकर्षक मूर्ती आणि स्वच्छता – शिस्तबध्दता या 4 क्षेत्रांतर्गत प्रत्येकी 5 पारितोषिके दिली जाणार आहेत.
  • या सर्व क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम ठरणा-या 5 गणेशोत्सव मंडळांना नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळे म्हणून पारितोषिकाने सन्मानीत केले जाणार आहे.