पहिल्या टप्यातील कामासाठी दीड वर्ष लागणार

नवी मुंबई विमानतळाच्या कामाबाबत मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई, 2 ऑगस्ट 2017/AV News Bureau:

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी केंद्र शासनाच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या असून या विमानतळाचे पहिल्या टप्प्याचे काम सुरु झाले आहे. या कामासाठी सुमारे दीड वर्षाचा कालावधी लागणार असून त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील कामास सुरुवात होणार आहे. डिसेंबर 2019 पर्यंत महत्त्वाचे टप्पे पूर्ण होतील, अशी माहिती  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी तीन हजार 500 घरांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. याची कार्यवाही सुरु आहे. पहिल्या टप्प्यात विकासपूर्व कामे सुरु करण्यात आली आहेत. यात वृक्षतोडणी तसेच उलवे नदीचा प्रवाह बदलणे व जमिनीवर भराव टाकणे यासारखी कामे सुरु करण्यात आली आहेत. विमानतळ उभारणीच्या कामामध्ये स्थानिकांना रोजगार मिळेल याची काळजी घेतली जाईल. नवी मुंबई विमानतळ विकसित झाल्यानंतर दळण वळणासह उद्योग आणि पर्यटकांची ही वाढ होणार आहे. सुमारे एक कोटी प्रवासी उतरु शकतील अशाप्रकारे येथील विमानतळ विकसित करण्यात येईल,असे त्यांनी सांगितले.

ट्रान्स हार्बर लिंकचे कामही सुरु करण्यात आले आहे. याबाबतची निविदा मागविण्यात आली आहे. जायको कंपनीमार्फत कर्जही उपलब्ध झाले आहे. जुन्या विमानतळापासून नव्या विमानतळाला जोडणारी मेट्रो सुरु करण्यात येणार आहे. ट्रान्स हार्बर सुरु होण्यापूर्वी जल वाहतूक सुरु होईल, अशीही माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.

दरम्यान, नवी मुंबईचे विमानतळ विकसित होईपर्यंत जुहू येथील धावपट्टीवर विमाने उतरण्याचा पर्याय पडताळून पाहण्यात येईल. नांदेड-मुंबई विमान वाहतूक सुरु होण्यासंदर्भातील अडचणी सोडविण्यात आल्या असून लवकरच वाहतूक सुरु करण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.