राज्यातील 20 बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल

मुंबई, 14 डिसेंबर 2017/Avirat Vaatchal News :

राज्यातील सर्व रुग्णालयांच्या तपासणी धडक मोहीमेमध्ये 81 बोगस डॉक्टर आढळून आले असून त्यापैकी 20 डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज विधानसभेत दिली.

15 मार्च ते 31 मे 2017 या कालावधीत राज्यातील सर्व रुग्णालयांच्या तपासणीची धडक मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये 37 हजार 68 रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 6742 रुग्णालयांमध्ये कायद्यातील तरतूदीनुसार त्रुटी आढळून आल्या आहेत.

विधानसभा सदस्य मेधा कुलकर्णी यांनी राज्यातील रुग्णालयांच्या तपासणी मोहिमेबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला दिलेल्या लेखी उत्तरात आरोग्य मंत्र्यांनी म्हटले आहे की, 37 हजार 68 रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 6742 रुग्णालयांमध्ये कायदेशीर त्रुटी आढळून आल्या. 2084 वैद्यकीय संस्थांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण कायद्याचे पालन न केल्याचे आढळून आले आहे. पथकाने तपासणीमध्ये आढळलेल्या त्रुटी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीसमोर मांडल्या आहेत.

या मोहिमेंतर्गत 169 वैद्यकीय संस्थांना दंड करण्यात आला आहे. 27 दवाखाने बंद करण्यात आले आहेत. वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 चे उल्लंघन झाल्याचे आढळून आले असून त्यामुळे चार केंद्र बंद करण्यात आले आहे. पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे पाच सोनोग्राफी मशीन सील करण्यात आल्या आहेत.