मराठा क्रांती मोर्चाला रामदास आठवलेंचा पाठिंबा

मुंबई, 9 ऑगस्ट 2017/AV News Bureau:

मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी काढलेल्या 9 ऑगस्ट रोजीच्या क्रांती मोर्चाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असल्याचे रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी जाहीर केले. मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये 16 टक्के आरक्षण देण्याच्या  राज्यशासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे,असेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठा सह देशातील गुर्जर, जाट,  लिंगायत ब्रह्मण आदी उच्च वर्णीय जातींतील  आर्थिकदृष्ट्या मागासांना संसदेत कायदा करून 25 टक्के आरक्षण देण्यात यावे. त्यासाठी राज्यघटनेत संशोधन करून आरक्षणाची मर्यादा  50  टक्क्यांहून वाढवून 75 टक्क्यांपर्यंत करावी,असेही आठवले यांनी सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीला राज्यातील दलितांचाही पाठिंबा आहे. यामुळे राज्यात दलित मराठा यांच्यात  सौहार्द सामाजिक ऐक्य वृद्धींगत होईल असे आठवले यांनी स्पष्ट केले.