न्यायालयीन चौकशी केल्यास भ्रष्ट मंत्री घरी जातील

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, 11 ऑगस्ट, 2017/AV News Bureau:

गृहनिर्माण आणि उद्योग विभागातील गैरव्यवहारांची न्यायालयीन चौकशी केल्यास एका मिनिटात मंत्री घरी जातील, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

विधानसभेत आज अंतिम आठवडा प्रस्तावावर ते बोलत होते. आम्ही सर्व पुराव्यानिशी मंत्र्यांचे भ्रष्टाचार सभागृहात मांडले. या आधीही डझनभर मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रदर्शन आम्ही लावले होते. मात्र आमचा आवाज दडपण्यात आला. मुख्यमंत्र्यांना राज्यात भ्रष्टाचार होत असल्याचेच मान्य नाही. पारदर्शक सरकारचा हा भ्रष्टाचार अपारदर्शक किंवा अदृश्य नाही. पण सरकार भ्रष्ट मंत्र्यांची पाठराखण करते आहे. ‘झिरो टॉलरन्स टुवर्ड्स करप्शन’ असे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या पक्षाचे सरकार प्रत्यक्षात ‘झिरो अॅक्शन टुवर्ड्स करप्शन’ या भूमिकेतून काम करत असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला.

सभागृहात विरोधी पक्षांचाच नव्हे तर सत्ताधारी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचाही आवाज दडपला जात असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. वारंवार मागणी करूनही माजी मंत्री एकनाथ खडसे यांना उद्योग विभागाकडून माहिती मिळत नाही, याचाही दाखला विखे पाटील यांनी दिला.