200 ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये पर्यटकांसाठी लवकरच निवास व्यवस्था

  •  पर्यटन मंत्री जयकुमार रावल

मुंबई, 6 ऑक्टोबर 2017/AV News Bureau:

पर्यटकांना प्रत्यक्ष किल्ल्यामध्ये राहून तेथील इतिहास, संस्कृती आणि स्थापत्याची माहिती तसेच आनंद घेता यावा यादृष्टीने राज्यातील सुमारे २०० किल्ल्यांमध्ये पर्यटकांसाठी जागतिक दर्जाची निवास व्यवस्था उभी करण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. केंद्रीय पुरातत्व खात्याशी समन्वय साधून राज्य शासनाचा पर्यटन विभाग यासाठी प्रयत्न करेल, अशी माहिती पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.   residential-arrangement-for-tourist-in-forts

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ५ ते २५ ऑक्टोबर दरम्यान राज्यात पर्यटन पर्व साजरे करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था, कंपन्या यांच्या उपस्थितीत गुरुवारी हॉटेल ट्रायडंट येथे  आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली.

  • एमटीडीसी रिसॉर्टस्‌मध्ये पर्यटकांना सवलत

पर्यटन पर्वाच्या काळात एमटीडीसीच्या रिसॉर्टस्‌मध्ये राहणाऱ्या पर्यटकांना प्रोत्साहन सवलत देण्यात यावी, अशी सूचना यावेळी त्यांनी एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांना केली. ते पुढे म्हणाले की, राज्य शासनाने पारंपारीक पर्यटनाबरोबरच हेरीटेज टुरिजम, ॲग्रो टुरीजम, क्रुझ टुरीजम, माइन टुरीझम, कॅराव्हान टुरिजम, वेलनेस टुरीजम, बॉलीवूड टुरीजम, वाईल्डलाईफ टुरीजम अशा विविध नवनवीन पर्यटन क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरवल्याचेही  रावल यांनी सांगितले.