‘तेजस’ मध्ये अन्नातून विषबाधा

 24 प्रवासी चिपळुणच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल ; तिघे अत्यवस्थ

  • रत्नागिरी/नवी मुंबई, 15 ऑक्टोबर 2017/AV News Bureau:

या ना त्या कारणाने सतत चर्चेत राहणाऱ्या तेजस एक्सप्रेससाठी आणखी एक धक्कादायक बाब ठरली आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणा-या या सुपरफास्ट एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या सुमारे 24 जणांना गाडीत पुरवण्यात आलेल्या अन्नातून विषबाधा झाली आहे. यातील 3 प्रवासी अत्यवस्थ आहेत. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एकच भितीचे वातावरण पसरले असून अन्नबाधा झालेल्या प्रवाशांना तातडीने चिपळूण येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे रेल्वेमध्ये प्रवाशांना पुरविण्यात येणाऱ्या जेवणाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कोकण रेल्वे मार्गावरून करमाळीहून सीएसएमटीकडे येणा-या तेजस एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना आयआरसीटीसीच्या माध्यमातून जेवण पुरविण्यात येते. रविवारी नेहमीप्रमाणे दुपारी प्रवाशांना मांसाहारी जेवण देण्यात आले. मात्र अनेक प्रवाशांनी हे जेवण केल्यानंतर त्यांना मळमळू लागले आणि उल्ट्या होवू लागल्या. सुमारे 24 जणांना या जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी पत्रकारांनी दिली.

  • अन्नातून बाधा झालेल्या प्रवाशांना तात्काळ चिपळुण येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  त्यांच्या उपचाराचा खर्च कोकण रेल्वे प्रशासन करणार आहे. तसेच याप्रकरणी जेवणाच्या दर्जाबाबत सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचेही गुप्ता यांनी सांगितले.

 

  • तेजस एक्सप्रेस सुरू झाल्यापासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहीली आहे. तिकिटाचे दर अधिक, प्रवाशांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा, ट्रेनमधील हेडफोनची चोरी यामुळे तेजस सतत चर्चेत राहीली. त्यातच आता तेजसमध्ये पुरविण्यात आलेल्या जेवणातून प्रवाशांना विषबाधा झाल्याचे समोर आल्यामुळे प्रवाशांच्या मनात भिती पसरली आहे.