कर्जमाफीचा पहिला हफ्ता 18 ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जालना, 16 ऑक्टोबर 2017/AV News Bureau:

येत्या 18  ऑक्टोबरपासून कर्जमाफीचा पहिला हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली .

जालना तालुक्यातील कडवंची या गावातील सिमेंट नाला बंधाऱ्याची पहाणी व जलपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

शेतकऱ्यांच्या पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून शासन प्रयत्न करीत आहे. गटशेती ही नवीन योजना तयार करण्यात आली आहे.  शेतीक्षेत्रात यापूर्वी गुंतवणूक होत नव्हती परंतु राज्य शासनाने या क्षेत्रात 25 हजार कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक वाढवलेली आहे.  देशातील द्राक्षे व डाळींबाला परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.  जालना जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात आहे. तसेच ड्रायपोर्ट हा प्रकल्प साकारला जात आहे.   जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या फळपिकांना या प्रकल्पाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात नक्कीच परिवर्तन होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.