राजेंद्र घरत यांचे ब्रेललिपीतील 13 वे पुस्तक प्रकाशित

रत्नागिरी, 6 जानेवारी 17/AV News Bureau:

ब्रेललिपीचा जनक लुईस ब्रेल यांच्या 209 व्या जन्मदिनाचे औचित्य साधून ‘गाऊ त्यांना आरती’ या ब्रेललिपीतील पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक अशोक लोटणकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. रत्नागिरी येथील स्नेहज्योती निवासी अंधविद्यालयात हा कार्यक्रम पार पडला. नवी मुंबईतील पत्रकार राजेंद्र घरत यांचे ब्रेललिपीतील हे 13 वे पुस्तक आहे.
घरत यांचे दोन हजार नऊ सालापासून स्तंभलेखन स्वरूपात प्रसिध्द झालेले लेखन या अंधशाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सेनगुप्ता यांनी ब्रेललिपीत रुपांतरित केले आहे. या मुलांमध्ये असलेल्या कला आणि क्रिडागुणांमधून ही मुले आयुष्यात नक्कीच यशस्वी होतील असा विश्वास अशोक लोटणकर यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी मुलांच्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण पार पडले. या कार्यक्रमाच्या विचारमंचावर यश स्नेहा ट्रस्टच्या अध्यक्ष आशाताई कामत, सामाजिक कार्यकर्त्या जयश्री वऱहाडे, शीतल भोईर, संजय भोईर, खेड येथील गोपीनाथ मुंडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाल्मिक परिहार,स्तंभलेखक एकनाथ मढवी, आसावरी भोईर, समाजसेवक रमेश पाटील आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन उत्तम जैन यांनी केले.

gharat-2