विमानतळाच्या उभारणीसाठी विकासपूर्व कामे डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण होणार

नवी मुंबई, 25नोव्हेंबर 2017/Avirat Vaatchal News Bureau:

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी विकासपूर्व कामांना सुरूवात करण्यात आली आहे. विमानतळाच्या 2 हजार 268 हेक्टर पैकी विमानतळ गाभ्याच्या 1 हजार 161 हेक्टर परिसराचा विकास चार टप्यांमध्ये करण्यात येत आहे. ही कामे डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. विमानतळाच्या कामाचा पहिला टप्पा डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण होईल असा विश्वास सिडकोने व्यक्त केला.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासपूर्व कामांचा पाहणीदौरा  नुकताच पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता वर्मा यांनी माहिती दिली. यावेळी सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उलवे टेकडीची उंची कमी करण्यासाठी या भागात सध्या ब्लास्टिंग केले जात आहे. यामधून मिळणा-या दगड मातीतून विमानतळासाठी भराव केला जात आहे. ही टेकडी समुद्रसपाटीपासून 5.5 मीटर उंचीपर्यंत करण्याचे काम डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

विमानतळासाठी दहा गावांमधील तीन हजार कुटुंबांच पुर्नवसन करावं लागणारं आहे. यामध्ये साडेतीनशे ते चारशे कुटुंबांची नव्याने नोंदणी करण्यात आली आहे.  विमानतळ प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन व पुनःस्थापन वडघर व वहाळ भागात करण्यात येत आहे. यामध्ये एकूण 1977 भूखंड सर्व पायाभूत व सामाजिक सुविधा प्रदान करून विकसित करण्यात आले आहेत. उर्वरित भूखंड फेब्रुवारी 2018 पर्यंत विकसित केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे प्रकल्पबाधितांपैकी एकूण 250 घरांनी निष्कासन करून विकसित भूखंडांचा ताबा घेतला आहे. 750 प्रकल्पबाधितांनी सिडकोसोबत पुनर्वसनाच्या भूखंडांचे करारनामे केले आहेत तर विमानतळ प्रकल्पबाधितांना ऑक्टोबर 2017 पासून पुढील 18 महिन्याचे भाडे देण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आले असल्याची माहीती वर्मा यांनी दिली.