स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये नवी मुंबई देशात पहिल्या तीन क्रमांकात हवी

  • महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांचे लक्ष्य
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, २२ जुलै २०१९:

नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये दरवर्षी देशातले आपले मानांकन उंचावत ठेवले असून यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण 2020 ला सामोरे जाताना सध्याचे सातवे मानांकन उंचावत देशात पहिल्या तीन क्रमांकात नवी मुंबई असेल हे ध्येय नजरेसमोर ठेवून एकत्रितपणे काम करूया अशा शब्दात नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी महापालिका अधिकारी, कर्मचारीवृंदाला लक्ष्य दिले. महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात स्वच्छ सर्वेक्षण 2020 च्या अनुषंगाने आयोजित कार्यआढावा बैठकीत आयुक्तांनी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला.

यावेळी त्यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त  महावीर पेंढारी, घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त तुषार पवार, परिमंडळ 2 चे उपआयुक्त  दादासाहेब चाबुकस्वार तसेच सर्व विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा व कनिष्ठ अभियंता तसेच स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व उप निरीक्षक उपस्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिकेने ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण’ च्या अनुषंगाने नेहमीच लक्षवेधी कामगिरी केली असून त्यात सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी यांच्याप्रमाणेच नवी मुंबईकर नागरिकांचा अत्यंत महत्वाचा असा सक्रीय सहभाग लाभला असल्याचे विशेषत्वाने महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी विशेषत्वाने नमूद केले. यापुढील काळात अधिक उत्तम अशा लोकसहभागासाठी प्रयत्नशील रहावे असे सूचित करतानाच आयुक्तांनी शहरी भागाप्रमाणेच गावठाण व झोपडपट्टी परिसराकडेही विशेष लक्ष देत लोकसहभाग वाढीवर भर देण्याच्या सूचना केल्या.
शहर स्वच्छता ही केवळ आपली जबाबदारी नसून सामाजिक आरोग्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट असल्याने स्वच्छता ही नियमित सवय व्हावी हे नागरिकांना पटवून देण्याकडे व ते कृतीत आणण्याकडे विशेष लक्ष देणेबाबत आयुक्तांनी याप्रसंगी निर्देशित केले. हे आपले नवी मुंबई शहर देशात अधिकाधिक नावाजले जावे याकरिता प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने आपले संपूर्ण योगदान द्यावे असे आवाहन आयुक्तांनी या निमित्ताने नागरिकांना केले आहे.

======================================================

इतर बातम्यांचाही मागोवा