अर्बनहाट येथे गांधी शिल्प बाजार

  • 1 ते 10 डिसेंबर या काळात प्रदर्शनाचे आयोजन 

नवी मुंबई, 30 नोव्हेंबर 2017/Avirat Vaatchal News Bureau:

सीबीडी बेलापूर येथील अर्बन हाटमध्ये उद्यापासून गांधी शिल्प बाजारचे आयोजन करण्यात आले आहे. 10 डिसेंबरपर्यंत सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत भरणाऱ्या या प्रदर्शनात 25 राज्यांतील सुमारे 100 कलाकार  भाग घेणार आहेत.

 

सिडकोने विकास आयुक्त (हस्तकला) प्रायोजित गांधी शिल्प बाजार या हस्तकला वस्तू प्रदर्शनाचे अर्बन हाट येथे आयोजन केले आहे. सन 2011पासून सिडको अर्बन हाट येथे गांधी शिल्प बाजारचे आयोजन करित आहे. या कार्यक्रमाचे हे सलग आठवे वर्ष आहे. विकास आयुक्त (हस्तकला) अंतर्गत नोंदणी केलेल्या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमाचे १००% प्रायोजकत्व विकास आयुक्त (हस्तकला), वस्त्रोद्योग मंत्रालय (भारत सरकार), नवी दिल्ली यांच्याकडे आहे तर सिडको या कार्यक्रमाचे आयोजन करते.  इतर जिल्ह्यांतून आणि राज्यांतून येणारे कलाकार हे नियमानुसार महागाई भत्ता, प्रवास भत्ता व मालवाहतुकीचा खर्च मिळवण्यास पात्र आहेत.

या राज्यांमधील कलाकार सहभागी होणार

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, ओदिशा, गुजराथ, आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पंजाब, हरियाणा अशा विविध राज्यांतील कारागिर आपल्या हातमाग व हस्तकला उत्पादनांच्या प्रदर्शनार्थ सहभागी होणार आहेत.

प्रदर्शनातील वस्तू

या प्रदर्शनात ताग, धातूंपासून केलेल्या वस्तू, चामड्याची उत्पादने, कृत्रिम दागिने, दगडापासून केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, गालिचे, वस्त्रे, घर सजावटीच्या वस्तू, बांबूपासून केलेल्या वस्तू, लाकडावरील कोरीव काम, चटया, पडदे, बेडशीट इ. कुशल कारागिरांनी तयार केलेल्या वस्तू ग्राहकांना थेट व किफायतशीर दरात उपलब्ध होतील.

  • प्रदर्शनाच्या काळात शनिवारी आणि रविवारी सायंकाळी ७.०० ते रात्री ९.०० या वेळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
  • या कार्यक्रमात लावणी, पंजाबी, गुजराती नृत्यप्रकार, भरतनाट्यम, कथ्थक, संगीत, वाद्यवृंद आणि इतर लोककला सादर केल्या जातील.
  • सांस्कृतिक कार्यक्रमांचे वेळापत्रक 
  • १ डिसेंबर : प्रसिद्ध हिंदी गाण्यांचे सुनिल वाडेकर यांच्याकडून सादरीकरण
  • ३ डिसेंबर : कोलकाता येथील नृत्यांगना श्रीमती सुनिपा दास यांचे भरतनाट्य नृत्य सादरीकरण आणि हॅपी सिंगर्स यांचा वाद्यवृं
  • ९ डिसेंबर : राष्ट्रीय एकात्मता- पश्चिम बंगाल, केरळ, राजस्थान, गुजरात, पंजाब, ओरिसा अशा विविध राज्यांतील लोकनृत्यांचे सादरीकरण
  • १० डिसेंबर: लयसमुद्र – श्रुतीलिला यांचे लोकनृत्य आणि श्रुतीलय फाइन आर्टससाठी श्रीमती मोली यांच्याकडून द्रौपदीच्या कथेवर आधारित कथ्थक शैलीतील बॅलेनृत्याचे सादरीकरण.
  • फुड प्लाझा येथे खवय्यांच्या रसनातृप्तीसाठी कार्यक्रमाच्या कालावधीत दर दिवशी कोल्हापुरी, केरळी, पंजाबी, राजस्थानी, महाराष्ट्रीयन अशा विविध प्रांतीय खाद्यपदार्थांची रेलचेल असेल.