युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोदी सरकार पुन्हा सत्तेत येणे आवश्यक

जळगांव येथे युवक मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन
  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • जळगाव, 6  मार्च 2024 

मोदी सरकारच्या कार्यकाळात युवा पिढीच्या कर्तृत्वाला अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. गेल्या दहा वर्षांत देशाच्या झालेल्या प्रगतीत युवा पिढीचाही मोठा वाटा आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी युवकांनी सर्व पातळ्यांवर प्रयत्न करावे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी जळगांव येथे केले.

भारतीय जनता पार्टी तर्फे आयोजित युवक मेळाव्यात शाह बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, खा.उन्मेष पाटील, खा.रक्षा खडसे, खा. डॉ.हीना गावित, खा. डॉ.सुभाष भामरे, भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, अमोल जावळे, ज्ञानेश्वर जळकेकर महाराज आदी यावेळी उपस्थित होते. या मेळाव्याला युवक युवतींची प्रचंड संख्येने उपस्थिती होती.

शाह म्हणाले की, मोदी सरकारने विकसित भारत घडविण्यासाठी युवक, महिला, शेतकरी, गोरगरीब वंचित अशा सर्व वर्गांसाठी अनेक धोरणे आखली. युवा पिढीला उद्योग -व्यवसायात आपले कर्तृत्व सिद्ध करता यावे यासाठी मोदी सरकारने संधी उपलब्ध करून दिल्या. स्टार्ट अप च्या माध्यमातून अनेक युवा उद्योजक तयार झाले. युवा पिढीने देशाच्या विकासात मोठा हातभार लावला आहे.

या वेळची निवडणूक देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. भारताला विश्वगुरु बनविण्याची क्षमता असलेले  मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येणे युवा पिढीच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. देशाला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवणे, 2036 मध्ये भारतात ऑलिम्पिक स्पर्धा भरविणे आणि 2040 मध्ये चंद्रावर अंतराळवीर पाठवणे अशी दृष्टी ठेवून मोदी सरकार काम करत आहे, असेही शाह यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी विरोधकांच्या घमंडिया आघाडीवर आणि राज्यातील महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. घमंडिया आघाडीतील पक्षांना आपल्या कुटुंबाचीच काळजी आहे, त्यांना जनतेची काळजी नाही. मोदी सरकार देशवासियांची काळजी घेण्यास कटीबद्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.

========================================================


========================================================

========================================================