लेखक, साहित्यिक भूमिकाच घेत नाहीत -राज ठाकरे

मुंबई, 22 नोव्हेंबर 2016/AV News Bureau :

महाराष्ट्रात एक काळ असा होता की, कोणत्याही सामाजिक घडामोडीवर लेखक, साहित्यिक, कवी, कलावंत ठोस भूमिका घेऊन रस्त्यावर उतरायचे. परंतु आता तसे साहित्यिक राहीले नसून जे आहेत ते कोणतीच भूमिका घेत नाहीत, अशी खंत व्यक्त करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच अध्यक्ष राज ठाकरे  यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र एकदा अशा सर्वच क्षेत्रामध्ये पुढे गेला की मागे पडला याचे मुल्यमापन करण्याची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

टिव्ही पत्रकारांच्या न्यूजरूम लाईव्ह या दिवाळी अंकाचे प्रकाशन नुकतेच राज ठाकरे यांच्याहस्ते यशवंतराव चव्हाण सेंटरच्या रंगभवन सभागृहात करण्यात आले. त्यावेळी राज ठाकरे बोलत होते. या कार्यक्रमाला अंकाच्या संपादकीय टिम मधील पत्रकार कमलेश सुतार, पंकज दळवी, प्रशांत डिंगणकर व कार्यक्रमाचे सुत्रसंचालक मिलींद भागवत व्यासपीठावर उपस्थित होते तर सभागृहात महाराष्ट्र पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.जोशी, किरण नाईक, मिड्डे चे राजकीय संपादक धर्मेंद्र जोरे, पिटीआय चे विलास तोकले यांच्यासह टिव्ही आणि प्रिंट मधील अनेक पत्रकार उपस्थीत होते.

महाराष्ट्रात अनेक गुणी साहित्यिक होऊन गेले आणि वेळोवेळी त्यांनी आपल्या भूमिका ठोसपणे मांडल्या. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरले. पण आज साहित्यिक कुठे गेले ? त्यांच्या भूमिका काय आहेत?  का भूमिका घेत नाहीत ? असा करडा सवाल करत  एकदा महाराष्ट्र या सगळ्याच्या बाबतीत पुढे गेलाय की मागे पडलाय याचे विश्लेषण होण्याची गरज आहे, असे मत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कमलेश सुतार यांनी केले. तर आभार पंकज दळवी यांनी मानले. तर न्यूजरूम लाईव्ह चे मुखपृष्ठ करणारे शिशिर शिंदे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. मुख्य कार्यक्रमा पूर्वी पत्रकारांच्या कवितांचा न्यूजलेस कवितेचा पंचविसावा कार्यक्रम सादर झाला. यावेळी प्रशांत डिंगणकर यांनी सुत्रसंचालन करत पंकज दळवी, सुरेश ठमके, रचना विचारे आणि वैभव कुलकर्णी यांच्या कवितांचा मैफिल रंगतदार केली. गतवर्षी याच दिवाळी अंकाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग झाला. आणि वर्षभरात पंचविस कार्यक्रमांची मजल गाठणाऱ्या या चमूचे यावेळी राज ठाकरे यांच्या हस्ते विशेष कौतुक करण्यात आले.