एसटीचा मराठी वाचन सप्ताह

मुंबई, 23 फेब्रुवारी 2018/अविरत वाटचाल न्यूज:

ज्येष्ठ कवी, कुसुमाग्रज (वि.वा. शिरवाडकर) यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळातर्फे राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर 27 फेब्रुवारी ते 5 मार्च या काळात मराठी वाचन सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

या सप्ताहानिमित्त प्रत्येक बसस्थानकावर मराठी भाषेतील पुस्तके, ग्रंथ, काव्यसंग्रह, प्रवासवर्णने यांच्या विक्रीची दालने उभारली जाणार आहेत. या दालनांमधून विविध प्रकाशनसंस्था, पुस्तक विक्री केंद्रांद्वारे एसटी कर्मचारी आणि प्रवाशांना सवलतीच्या दरात पुस्तक विक्री केली जाणार आहे.

विविध समाजमाध्यमांच्या आहारी गेलेल्या नव्या पिढीला मराठी भाषेतील अभिजात लेखन संस्कृतीची  ओळख व्हावी या उद्देशाने या मराठी वाचन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

राज्यभरात एसटी बसेसने रोज सुमारे 70 लाख  प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांना मराठी वाचन सप्ताहाच्या काळात प्रवासवर्णने, विविधी लोकनेत्यांची चरित्रे, कथा, कादंबऱ्या, काव्यसंग्रह, मौलिक ग्रंथ असे विविध लेखन साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी मराठी पुस्तक प्रकाशनसंस्था व विक्री दुकानांना बसस्थानकांवर पुस्तक विक्री दालन उभारण्यासाठी एसटी महामंडळातर्फे विनामुल्य मोकळी जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.