राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर

मुंबई, 5 फेब्रुवारी 2018/अविरत वाटचाल न्यूज:

महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून निवडून देण्यासाठीच्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी या महिन्यात निवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी 12 मार्च पर्यंत नामनिर्देशन पत्रे दाखल करता येतील.या रिक्त जागांसाठी 23 मार्च रोजी मतदान घेण्यात येणार असल्याबाबत निवडणुकीची सूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाने प्रसिद्ध केली आहे.

  • उमेदवार किंवा त्याच्या सूचकाला उमेदवारासाठीची नामनिर्देशनपत्रे कक्ष क्र. 1, तळमजला, विधानभवन, मुंबई येथे 12 मार्चपर्यंत सार्वजनिक सुट्टीचा दिवस वगळून सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मिळू शकणार आहेत. याशिवाय याच ठिकाणी व याच कालावधीत महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव व निवडणूक निर्णय अधिकारी विलास गो. आठवले किंवा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष नलावडे यांच्या समक्ष उमेदवाराची नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार आहे.
  • नामनिर्देशनपत्रांची छाननी 13 मार्चरोजी विधान भवनातील सातव्या मजल्यावरील कक्ष क्रमांक 712 मध्ये दुपारी 12 वाजता करण्यात येणार आहे.
  • उमेदवारी मागे घेण्याची सूचना उमेदवार किंवा त्याच्या कोणत्याही सूचकाकडून किंवा उमेदवाराकडून लेखी अधिकार दिलेल्या निवडणूक अभिकर्त्याला 15 मार्च रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत देता येईल. निवडणूक लढविली गेल्यास 23 मार्च  रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल, असेही निवडणुकीच्या सूचनेनुसार स्पष्ट करण्यात आले आहे.