हर घर दस्तक अभियान अंतर्गत 36 हजाराहून अधिक नागरिकांचे लसीकरण

वर्दळीच्या ठिकाणी रुग्णवाहिकेतही लसीकरण

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 7 डिसेंबर 2021:

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातल्या नागरिकांचे कोविडच्या पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण झाले आहे. सध्या 8 लाख 30 हजार 172 नागरिकांनी म्हणजेच 75 टक्के नागरिकांनी कोविड लसीचा दुसरा डोस घेतलेला आहे. 100 टक्के नागरिकांचे दोन्ही डोस लवकरात लवकर पूर्ण व्हावेत याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग अधिक सक्रीय झाला आहे.

या अनुषंगाने महानगरपालिकेने 11 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत “हर घर दस्तक अभियान” प्रभावीपणे राबवित 26,948 नागरिकांचे लसीकरण केले आहे.

यामध्ये प्रत्येक नागरी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात घरोघरी जाऊन ज्यांचे लसीकरण राहिले आहे त्यांचे लसीकरण घराजवळच कऱण्यात आले. या मोहिमेचे महत्व लक्षात घेत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी हे अभियान नंतरच्या कालावधीतही सुरु ठेवावे असे निर्देश आरोग्य विभागाला दिलेले असून घरापर्यंत पोहचून लसीकरण करण्याची कार्यवाही नियमित सुरु ठेवण्यात आलेली आहे.

त्यानुसार नागरी आरोग्य केंद्रनिहाय तयार केलेल्या पथकांच्या माध्यमातून नागरिकांच्या घरापर्यंत पोहचून 1 ते 06 डिसेंबर या कालावधीत 9346 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. अशाप्रकारे ‘हर घर दस्तक’ अभियानाच्या माध्यमातून 36 हजार 294 नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे.

‘लसीकरण आपल्या दारी’

हर घर दस्तक अभियानाप्रमाणेच मार्केटसारख्या वर्दळीच्या ठिकाणी रुग्णवाहिका उभी करून ‘लसीकरण आपल्या दारी’ ही मोहिमही अधिक प्रभावी करण्यात आली असून 1 डिसेंबर पासून सहा दिवसात 1579 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.  

याशिवाय नेरुळ, वाशी व घणसोली या 3 रेल्वे स्टेशनप्रमाणेच 1 डिसेंबरपासून कोपरखैरणे व ऐरोली या दोन रेल्वे स्टेशनवरही कोव्हीड लसीकरण केंद्रे सुरु करण्यात आली असून त्याठिकाणी आत्तापर्यंत 7 हजार 840 नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे.

 

  • परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती देण्याचे आवाहन
  • ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका लक्षात घेऊन परदेशातून आलेल्या नागरिकांनी वा त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या विषयीची माहिती 022-27567460 या नमुंमपा कोविड वॉर रुमच्या क्रमांकावर त्वरित द्यावी असे आवाहन महपालिकेने केले आहे.

——————————————————————————————————