12 वीच्या पेपर फुटीप्रकरणी चौघांना अटक

नवी मुंबई, 6 मार्च 2017/AV News Bureau:

बारावीच्या मराठी तसेच सेक्रेटरियल  प्रॅक्टिस या दोन विषयाच्या प्रश्नपत्रिका परीक्षा सुरु होण्यापूर्वीच व्हाट्स अॅपवर व्हायरल केल्याप्रकरणी वाशी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. यामध्ये तीन विद्यार्थ्यांसह एका खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाचाही समावेश आहे. याप्रकरणात पोलिसांनी 28 मोबाइलदेखील जप्त केले आहेत.

२ मार्च रोजी बारावीच्या मराठी विषयाचा पेपर सुरु होण्याआधी सदर विषयाची प्रश्नपत्रिका व्हॉट्स अॅप वरून व्हायरल झाली होती. त्यामुळे मुंबई विभागीय मंडळाने शुक्रवारी नवी मुंबई पोलिसांकडे लेखी तक्रार केली होती. त्यानुसार वाशी पोलिसांनी मराठीच्या पेपरफुटी प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करुन या प्रकरणाचा तपास सुरु केला होता. मात्र 4 मार्च रोजी पुन्हा परिक्षा सुरु होण्यापुर्वी सकाळी  सेक्रेटरियल प्रॅक्टिस या विषयाची प्रश्नपत्रिकाही विद्यार्थ्यांना व्हॉट्स अॅपवर उपलब्ध झाली. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मुंबई विभागीय मंडळाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

वाशी पोलिसांनी सखोल तपास करून अझरुद्दीन शेख आणि राहुल भास्कर या एसवाय आणि टीवायच्या विद्यार्थ्यांना अटक केली. या दोन विद्यार्थ्यांनी मराठी आणि सेक्रेटरिय प्रॅक्टिस या विषयांच्या प्रश्नपत्रिका परिक्षा सुरु होण्यापुर्वी पंधरा मिनीटे आधीच 12 वीच्या  काही विद्यार्थ्यांना व्हॉट्स अॅपवरुन पाठविल्याचे तपासात आढळून आले. तसेच मोहमदद अमान शेख या १२ वीच्या बाहेरून बसलेला विद्यार्थ्यालाही अटक करण्यात आली असून त्याने हे पेपर दिले आहेत. याशिवाय कांदिवलीमधून सुरेश झा या खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. फुटलेले पेपर १५ व्हॉट्स अॅप ग्रुप वर फिरले असून याप्रकरणात २८ मोबाईल जप्त कण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांना 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.