सुखोईमधून डागलेल्या ब्रम्होसची चाचणी यशस्वी

मुंबई, 22  मार्च 2018/अविरत वाटचाल न्यूज:

संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या भारताच्या सर्वात शक्तीशाली सुपरसॉनिक क्रुझ मिसाइल ब्रम्होसची राजस्थानमधील पोखरण येथे आज सकाळी 8.42 च्या सुमारास पुन्हा एकदा यशस्वी चाचणी करण्यात आली. भारतीय वायुसेनेच्या सुखोई या लढाऊ विमानातून ब्रम्होस क्षेपणास्त्र डागण्यात आले.

डीआरडीओ आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडलेल्या या चाचणीदरम्यान ब्राम्होसने निश्चित केलेल्या लक्ष्यावर अचूक मारा केला. ब्रम्होसच्या या यशस्वी चाचणीमुळे भारताचे लष्करी आक्रमण अधिक धारदार झाले आहे. भारताच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विटवर ही माहिती दिली आहे.

ब्रम्होसची खास वैशिष्ट्ये

  • ब्रम्होस क्षेपणास्राची गती ही आवाजाइतकी म्हणजे 2.8 मॅक इतकी आहे.
  • या क्षेपणास्राची मारा करण्याची क्षमता 290 कि.मी. इतकी असून 300 कि.लो.ग्रॅम इतक्या वजनाची स्फोटके वाहून नेण्याचीही क्षमता आहे.
  • भारताकडील हे अत्याधुनिक क्षेपणास्र अद्याप चीन आणि पाकिस्ताननेही विकसित केले नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे ब्रम्होस क्षेपणास्राची यशस्वी चाचणी भारतासाठी दिलासादायक बाब आहे.

भारत आणि रशियाने संयुक्तरित्या विकसित केलेल्या ब्रम्होस क्षेपणास्राची मारकक्षमता 400 कि.मी.पर्यंत वाढविणे शक्य होणार आहे. कारण 2016 मध्ये मिसाइल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजिम (mtcr) चा पूर्ण सदस्य झाल्यानंतर या क्षेत्रातील भारतावरील काही निर्बंध हटवले आहेत.