आदिवासी  विद्यार्थ्यांची एव्हरेस्टला गवसणी

अविरत वाटचाल न्यूज

मुबंई,16 मे 2018:

आकांक्षापुढे जिथे गगन ठेंगणे…या काव्य ओळींची आठवण यावी असे धाडस करण्यात चार आदिवासी विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. जगातील गिर्यारोहकांना भुरळ पाडणा-या सर्वात उंच आणि अवघड माउंट एव्हरेस्ट गवसणी घालण्यात मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडवी, कविदास कातमोडे यशस्वी ठरले आहेत.

एकात्मिक आदिवासी प्रकल्प चंद्रपूर, जिल्हा प्रशासन चंद्रपूर आणि आदिवासी विकास विभागाने आदिवासी विद्यार्थ्यातील नैसर्गिक काटक व धाडसीपणाला साद घालत मिशन शौर्यची आखणी केली. प्रधान सचिव मनीषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा वेगळा उपक्रम पहिल्यांदाच विभागातर्फे राबविण्यात आला.

मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडवी, कविदास कातमोडे, आकाश मडवी, आकाश अत्राम, शुभम पेंदोर, विकास सोयाम, इंदू कन्नाके, छाया आत्राम हे सर्व चंद्रपूर जिल्ह्यातील बोरडा, देवडा जिवती ब्लॉक्स मधील आदिवासी कुटुंबांतील मुले-मुली आदिवासी विकास विभागाच्यावतीने गेल्या महिन्यात मिशन शौर्यवर निघाले होते.

  • जुलै २०१७ पासून या विद्यार्थ्याचे प्रशिक्षण सुरु झाले होते. दार्जिलींग, लेह लडाख या ठिकाणी या मुलांना प्रशिक्षकांकडून गिर्यारोहणाचे प्रशीक्षण देण्यात आले. गेल्या महिन्यात ११ एप्रिल रोजी हे विदयार्थी  मुंबईवरुन काठमांडूला रवाना झाले होते.

 

  • मोहिमेवर जाण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्यासह आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी या विद्यार्थ्यांना भेटून प्रेरणात्मक शुभेच्छा दिल्या होत्या.  या मोहिमेच्या ह्या अंतिम टप्प्यासाठी त्यांच्याबरोबर सपोर्ट स्टाफ व व्यवस्थापकांबरोबरच १५ शेर्पा, एक high altitude तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते. या मोहिमेतील अन्य विकास सोयाम व इंदु कन्हाके हे ही लवकरच लक्ष्य गाठतील व अन्य विद्यार्थ्याची चढाई सुरू असून लवकरच तेही एव्हरेस्ट सर करतील.

इतिहासातील हा सोनेरी क्षण

  • आदिवासी विकास विभागाच्यावतीने मिशन शौर्य या मोहिमेत भारताचा झेंडा एव्हरेस्टवर लावण्यात आदिवासी विद्यार्थी विद्यार्थिनी यशस्वी ठरले आहेत. आदिवासी विकास विभागाच्या इतिहासातील हा सोनेरी क्षण असल्याचे मंत्री विष्णु सवरा यांनी सांगितले.  विभागातर्फे राबविण्यात आलेले हे पहिलेच धाडसी मिशन होते. यामध्ये विद्यार्थ्यानी मिळवलेले यश हे नक्कीच प्रेरणादायी आहे. भविष्यातही आदिवासी विद्यार्थ्याच्या विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतील. मिशन शौर्यशी निगडीत प्रत्येकाचे हे यश असल्याचे आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी सांगितले.

एव्हरेस्ट वीर