इंडियन स्वच्छता लीग” अंतर्गत नवी मुंबईकर करणार स्वच्छतेचा जागर

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, २१ सप्टेंबर २०२२

१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत केंद्र सरकारच्या नगरविकास विभागामार्फत ‘स्वच्छ अमृत महोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत ‘इंडियन स्वच्छता लीग’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून  ‘युथ वर्सेस गार्बेज’ ही टॅगलाईन केंद्र सरकारमार्फत जाहीर करण्यात आली आहे. या स्वच्छता कार्यात युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग हे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवले असून २२ सप्टेंबर रोजी शहरात विविध ठिकाणी स्वच्छता विषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  यावेळी संगीतकार शंकर महादेवन, अभिनेते मकरंद अनासपुरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

‘इंडियन स्वच्छता लीग’ अंतर्गत सर्वात मोठा उपक्रम बेलापूर येथील राजीव गांधी स्टे़डियममध्ये सकाळी ८.३०वाजता आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने विद्यार्थी व युवक अस्वच्छता विरोधातील लढाईत सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्र येथेही केले जाणार असून त्याठिकाणीही हजारो विद्यार्थी, युवक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपणाव्दारे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

याशिवाय पामबीच मार्गावर महापालिका मुख्यालय इमारत ते मोराज सर्कल सानपाडा पर्यंत सकाळी ७.३० वाजता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा झळकवत  मानवी साखळीच्या माध्यमातून स्वच्छता संदेश प्रसारित करण्यात येणार आहे. यामध्ये महिला बचत गट व महिला संस्था आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्रीसदस्य व विविध सेवाभावी संस्था प्रतिनिधी तसेच पर्यावरणप्रेमी नागरिक सहभागी होत आहेत. त्याचप्रमाणे यावेळी कांदळवन स्वच्छता मोहीमही राबविली जाणार आहे.

तृतियपंथीयांचाही सहभाग

सकाळी ७ वाजता वाशी सेक्टर १० ए, मिनी सी शोअर याठिकाणी तृतीयपंथी नागरिक ‘स्वच्छता कार्यात आमचाही सहभाग’ असा संदेश प्रसारित करत परिसर स्वच्छ करणार आहेत. याशिवाय नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य हे पारसिक हिल, सीबीडी, बेलापूर या निसर्गस्थळी सकाळी ७ वाजता ओला, सुका व घरगुती घातक कच-याच्या वर्गीकरणाचे महत्व प्रदर्शित करणार आहेत. तसेच परिसराची स्वच्छताही करणार आहेत.