नवी मुंबईत मेट्रोचे डबे दाखल

  • नोव्हेंबर २०१९ मध्ये बेलापूर-पेंधर मार्गावर मेट्रोची चाचणी घेण्याचा प्रयत्न

अविरत वाटचाल न्यूजनेटवर्क

नवी मुंबई, १२ एप्रिल २०१९

“मेट्रोने प्रवास करण्याचे नवी मुंबईकरांचे स्वप्न आता लवकरच साकार होणार असून आवश्यक त्या तांत्रिक बाबींची पूर्तता करून नजीकच्या काळात बेलापूर-पेंधर मार्गावर मेट्रो सेवा सुरू होईल”, असे उद्गार सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी तळोजा मेट्रो आगारात नुकत्याच दाखल झालेल्या मेट्रोच्या सहा डब्यांची (रेक्स) पाहणी करतेवेळी काढले. सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर नोव्हेंबर, 2019 मध्ये बेलापूर-पेंधर मार्गावर मेट्रोची चाचणी घेण्याचा सिडकोचा प्रयत्न असून याबाबतच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांस देण्यात आल्या आहेत, असे श्री. लोकेश चंद्र यांनी या वेळी सांगितले.

नवी मुंबईकरांना शहरांतर्गत वाहतुकीचा जलद  व सुखकारक पर्याय उपलब्ध व्हावा तसेच नवी मुंबईतील नोड् एकमेकांना सुलभरित्या जोडले जावेत या उद्देशाने सिडकोने सन 2011 मध्ये नवी मुंबई (उन्नत) मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेतले होते. या प्रकल्पांतर्गत मार्ग क्र. 1- बेलापूर ते पेंधर (11 किमी),  मार्ग क्र. 2- खांदेश्वर ते तळोजा एमआयडीसी (7.12 किमी), मार्ग क्र. 3- पेंधर ते तळोजा एमआयडीसी (3.87 किमी) आणि मार्ग क्र. 4- खांदेश्वर ते नवी मुंबई  आंतरराष्ट्रीय विमानतळ (4.17 किमी) असे एकूण 4 मार्ग प्रस्तावित आहेत.
  • नवी मुंबई मेट्रो प्रकल्पबाबतचा सुसाध्यता अहवाल आणि बृहद् आराखडा तयार करण्याचे काम मे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांना सोपविण्यात आले होते. तर मेट्रोच्या विविध मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम मे. राईटस  लि. यांना सोपविण्यात आले होते. मार्ग क्र. 2 व 3 यांच्या डीपीआरला नुकतीच सिडको संचालक मंडळातर्फे मंजुरी देण्यात आली आहे.
  • सदर मेट्रो मार्ग क्र. 2, 3 आणि 4 यांकरिता अनुक्रमे रु. 2820.20 कोटी, रु. 1750.14 कोटी व रु. 1270.17 कोटी इतका खर्च अंदाजित आहे.  या मेट्रो मार्गांमुळे तळोजा परिसरात लोकसंख्येचा ओघ वळणार असून तेथे विकासाच्या व रोजगाराच्या संधी निर्माण होऊन मुंबईवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
  • नवी मुंबई मेट्रोकरिता चीनहून मागविण्यात आलेल्या डब्यांची रचना ही अद्ययावत व अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून प्रवाशांच्या गरजेनुरूप असल्याचेही  लोकेश चंद्र यांनी या वेळी सांगितले.
एका मेट्रोची प्रवासी क्षमता 1125 प्रवासी (बसलेले प्रवासी + उभे प्रवासी) इतकी आहे. या वेळी डब्यांमधील आसन व्यवस्था, हॅंडल, जाहिरातींच्या प्रक्षेपणाकरिता डिजीटल पॅनल्स, बाहेर 45 से. तापमान असतानाही सक्षमपणे कार्यरत राहणारी वातानुकूलन यंत्रणा, ऑटोमॅटिक ट्रेन ऑपरेशन, ऑबस्टॅकल डिटेक्शन, फायर अलार्म, ॲन्टी-स्कीड डिस्क ब्रेक इ. तांत्रिक वैशिष्ट्ये उपस्थितांसमोर उलगडून दाखविण्यात आली. 

=======================================================

इतर बातम्यांचाही मागोवा – व्हिडिओ