फूलकिडीच्या (थ्रिप्स) प्रादुर्भावामुळे यंदा हापूस आंबा संकटात

  • स्वप्ना हरळकर / अविरत वाटचाल
  • नवी मुंबई, १६ फेब्रुवारी २०२४

कोकण मुख्यतः हापूस आंब्यासाठी ओळखला जातो. त्यातही देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस आपापल्या चवीसाठी जगप्रसिद्ध आहेत. सध्या हापूस आंब्याला मोहोर येण्यास सुरवात झाली आहे. अशातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यात हापूस आंब्यावर मोठ्या प्रमाणात थ्रिप्त या फूलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरु झाला आहे. याचा फटका आंब्याच्या उत्पादनाला बसणार असून आंबा उत्पादकांची चिंता वाढली आहे. थ्रिप्सचा प्रसार थांबला नाही तर यंदाच्या हंगामातील हापूस आंब्याचे उत्पादन हातून जाण्याची शक्यता आहे.


थ्रिप्स ही फूलकिड असून ती आंब्याच्या नव्या आलेल्या मोहराचे देठ कुरतडते. त्यामुळे मोहोर करपायला सुरुवात होतो.आंबा तयार असल्यास सालही कुरतडते. त्यामुळे फळांचे आणि मोहोराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सध्या ही थ्रिप्स फूलकिड कोणत्याच किटकनाशकाला दाद देत नसल्यामुळे आंबा उत्पादक बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.


जानेवाही महिन्यात पडलेल्या चांगल्या थंडीमुळे आंब्याला मोठ्या प्रमाणात मोहोर आला. याचवेळी वातावरणात झालेला कमाल आणि किमाम तापमानातील बदल आणि इतर कारणांमुळे थ्रिप्स या फूलकिडीचा प्रादुर्भाव सुरु झाला आहे. कोणत्याच किटकनाशकांना ही फूलकिड जुमानत नसल्याचे आंबा बागायतदारांचे म्हणणे आहे. गेल्या दोन तीन वर्षांपासून या फूलकिडीचा प्रादुर्भाव होत आहे. मात्र यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात ही फूलकिड दिसत आहे. याबाबत फळ संशोधन केंद्राचे शास्रज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी याबाबत संशोधन करीत आहेत.

थ्रिप्स या फूलकिडीचा प्रादुर्भाव सध्या कोकणातील प्रत्येक भागात कमी अधिक प्रमाणात पहायला मिळत आहे. कोकणासह गुजरातमध्येही या पूलकिडीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. केवळ रायगड जिल्ह्यातील बाणकोट परिसरात अजूनही या फूलकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. या पूलकिडीच्या प्रादुर्भावामुळे हापूस आंब्याचा मोहोर जळाला असून उत्पादन ५० ते ६० टक्के घटण्याची शक्यता आहे.
-संजय पानसनरे, फळ व्यापारी, एपीएमसी

========================================================

========================================================

========================================================