सैन्य महाविद्यालय प्रवेशासाठी 1 व 2 जूनला पात्रता परीक्षा

ncc

 मुंबई,7 फेब्रुवारी 2017 /AV News Bureau:

डेहराडून (उत्तरांचल) येथील राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांसाठीची पात्रता परीक्षा दिनांक 1 जून आणि 2 जून रोजी पुणे येथे होणार  आहे. ही परीक्षा सातव्या वर्गात शिकणा-या किंवा सातवी उत्तीर्ण मुलांसाठी आहे.

ज्या विद्यार्थ्यांचे वय 1 जानेवारी 2018 रोजी अकरा वर्ष सहा महिन्यांपेक्षा कमी आणि 13 वर्षांपेक्षा अधिक नाही असे विद्यार्थी सदर परीक्षेस पात्र समजण्यात येतील. परीक्षेस बसणा-या मुलांचा जन्म 2 जानेवारी 2005 ते 1 जुलै 2006 या कालावधीतील असणे आवश्यक आहे. सदर विद्यार्थी 1 जानेवारी 2018 ला कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता 7 वी या वर्गात शिकत असावा किंवा 7 वी उत्तीर्ण असावा.

परीक्षेसाठी राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालयाची विहीत नमुन्यातील आवेदनपत्रे सादर करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कार्यालयामार्फत 25 जानेवारी 2017 पासून आवेदनपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. या आवेदनपत्रासोबत अनुसूचित जाती/जमातीतील विद्यार्थ्यांनी 505/- रुपये आणि खुल्या गटातील विद्यार्थ्यांनी 550/- रुपयांचा डिमांड ड्राफ्ट देणे आवश्यक आहे. सदर ड्राफ्ट फक्त स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचाच असावा. सदर ड्राफ्ट ‘कमांडंट, आर.आय.एम.सी., डेहराडून’ यांच्या नावे काढावा आणि त्या ड्राफ्टवर पेअेबल ॲट डेहराडून (तेलभवन बँक Code No01576) अशी नोंद असावी. दोन प्रतींत आवेदनपत्रासोबत जन्मतारखेच्या व जातीच्या दाखल्याची (अनुसूचित जाती/जमातीसाठी) छायांकित प्रत, शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट आणि अधिवासाच्या दाखल्याची सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे.

आवेदनपत्र, माहितीपत्र व 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका संच ड्राफ्ट प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कार्यालयाकडून स्पीड पोस्टाने पाठविण्यात येतील. तसेच विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका संच राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून, उत्तरांचल 248003 यांच्याकडूनही प्राप्त करुन घेता येऊ शकतील. मुदतीनंतर कोणतीही आवेदनपत्रे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारण्यात येणार नाहीत.

परीक्षेसाठी इंग्रजी, गणित आणि सामान्यज्ञान या तीन विषयांचे लेखी पेपर असतील. परीक्षार्थींना गणिताचा व सामान्यज्ञानाचा पेपर इंग्रजी अथवा हिंदीमध्ये लिहिता येईल. गणित व सामान्यज्ञान विषयांच्या प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि हिंदी भाषेत उपलब्ध होतील. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती 10 ऑक्टोबर 2017 रोजी घेण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी कळविले आहे.