कोकणच्या किनाऱ्यांवर 100 जीवरक्षक

मुंबई, 26 जुलै 2017/AV News Bureau:

कोकणातील पाच जिल्ह्यांमधील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 100 जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तराद्वारे विधानसभेत दिली.

रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पर्यटकांचे समुद्रात बुडून मृत्यू होण्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे,त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांविषयी दत्तात्रय भरणे, कालीदास कोळंबकर, वैभव नाईक आणि अन्य सदस्यांनी काल याबाबतचा तारांकीत प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता.

रायगड जिल्ह्यात जानेवारी 2016 ते मार्च 2017 या काळात 17 पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे  कोकणातील सर्व समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 100 जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचे फडणवीस यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे.

100 जीवरक्षकांची जिल्हानिहाय नियुक्ती पुढीलप्रमाणे

  • ठाणे ग्रामीण – 10
  • पालघर जिल्हा – 18
  • रायगड जिल्हा – 40
  • रत्नागिरी जिल्हा -7
  • सिंधुदुर्ग जिल्हा – 25

समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी केलेल्या उपाययोजना

  • समुद्र किनारी बिट मार्शल पेट्रोलिंग, पोलीस स्पीड बोटींची पेट्रोलिंगद्वारे गस्त
  • स्थानिक मच्छिमार आणि सागर रक्षक दलामार्फत पर्यटकांना धोक्याच्या सूचना देणे
  • पोलीस ठाणे स्तरावर समुद्रकिनारी भागात सागर रक्षक दल, मच्छिमार बांधव, मच्छिमार सोसायटी सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या बैठका घेऊन मार्गदर्शक सूचना देणे
  • समुद्रकिनारी असलेल्या उंच मनोऱ्यावरून टेहळणी करून खोल पाण्यात जाणाऱ्या पर्यटकांना लाउडस्पीकरवरून पाण्याच्या खोलीबाबत सूचित केले जाते.
  • समुद्री पर्यटकांच्या संरक्षणासाठी आवश्यक तेथे ग्रामपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिकेमार्फत धोक्याच्या सूचनांचे फलक पर्यटनस्थळी , समुद्र किनाऱ्यावर आणि गर्दीच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत.
  • मच्छिमार , सागर रक्षक दलाचे सदस्य आणि किनारा भागातील नागरिक यांच्याशी संपर्क साधण्यासाठी सर्व जिल्ह्यातील नियंत्रण कक्षांत कोस्टल हेल्पलाइन क्रमांक 1093 आणि बल्क एसएमएस यंत्रणा सुरू करण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी आपल्या उत्तरात दिली आहे.