हापूस आंब्याच्या वाहतुकीसाठी एसटी बसचा वापर करा

जनता दलाची परिवहन मंत्र्यांकडे मागणी
  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, १८ एप्रिल २०२०

कोरोनाच्या साथीमुळे आधीच कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला असताना आंब्याच्या वाहतुकीसाठी गाड्या उपलब्ध होत नसल्याने त्याच्या अडचणीत भरच पडली आहे. त्यामुळे सध्या प्रवासी वाहतूक बंद असल्याने आगारात उभ्या असलेल्या एसटी बसचा या वाहतुकीसाठी उपयोग करावा, अशी मागणी जनता दलाने राज्याचे परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांच्याकडे केली आहे.

कोरोना साथीमुळे साऱ्या देशातच संचारबंदी असून त्याचा मोठा फटका कोकणातील हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. मार्च महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर हापूस आंबा तयार व्हायला लागतो, नेमकी याच काळात कोरोना साथीमुळे देशात संचारबंदी लागू झाली. अनपेक्षितपणे संपूर्ण वाहतुकच बंद झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंबा झाडावरच राहू दिला होता. मात्र, आता संचारबंदी ३ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे.

दरम्यान, एकाचवेळी आता मोठ्या प्रमाणावर आंबा तयार असून त्याचे करायचे काय, असा प्रश्न सामान्य शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. आंबा वाहतुकीला सरकारने परवानगी दिली असली तरी एकूणच अडचणीमुळे दरवर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने ट्रक उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यामुळे एकीकडे फळे झाडावर तयार होऊन गळायला लागली आहेत, दुसरीकडे दरात मोठी घसरण झाली आहे. मुंबईत साधारण डझनाला ६०० ते ८०० रुपये मोजावे लागत असताना कोकणातील शेतकऱ्याला जागेवर चार ते साडेचार डझन आंब्याच्या पेटीला अवघे ८०० ते १००० रुपये मिळत आहेत. वाहतुकीची व्यवस्था न झाल्यास शेतकऱ्यांच्या हातात हेही पैसे पडणार नाहीत. त्यामुळे सरकारने सध्या प्रवासी वाहतूक बंद असल्याने आगारातच उभ्या असलेल्या एसटी बसचा यासाठी वापर करावा, अशी जनता दलाची सूचना आहे.

एसटी बसमधील सीट काढल्यास मोठ्या संख्येने आंब्याच्या पेट्यांची त्यातून वाहतूक करता येईल. एसटी बसमधील सीट काढणे, अवघड वाटत असले तरी प्रत्यक्षात साधारण दीड ते दोन तासात सीट काढून बस आंबा वाहतूकीसाठी तयार होऊ शकते, असे एसटीच्या कार्यशाळेतील जाणकारांचे म्हणणे आहे. यामुळे सद्य स्थितीत एसटीला उत्पन्नाचा एक मार्गही उपलब्ध होणार आहे, दुसरीकडे तयार आंबा मुंबई, पुणे वा अन्य शहरांपर्यंत पोहोचून शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे पडतील तर ग्राहकांनाही योग्य किमतीत तो मिळू शकणार आहे. त्यामुळे हापूस आंब्याच्या वाहतुकीसाठी एसटी बसचा वापर करू देण्याबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी जनता दल सेक्युलर पक्षाचे उपाध्यक्ष सुहास बने, मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, कार्याध्यक्ष सलिम भाटी यांनी राज्याचे परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांच्याकडे केली आहे.
========================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा