भाजीपाला शेतातून थेट सोसायटीच्या गेटवर उपलब्ध

नवी मुंबई महानगरपालिकेचा  उपक्रम
  • विरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, १८ एप्रिल २०२०   

कोव्हीड १९या घातक संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाऊनचा कालावधी मे २०२० पर्यंत वाढविण्यात आला आहे. या कालावधीत सर्वांनी घरातच थांबणे अत्यावश्यक आहे.  मात्र जीवनावश्यक व दैनंदिन गरजेच्या वस्तूंसाठी नागरिक बाजारात गर्दी करताना दिसत आहेत. ही गर्दी कमी करण्याकरिता महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी, पुरवठादार आणि ग्राहक यांच्यामध्ये समन्वय साधून शेतक-यांच्या शेतातून भाजीपाला व फळे थेट नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सोसायट्यांच्या दारात मागणीनुसार पोहचविण्याचा अभिनव उपक्रम नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सुरू करण्यात आला आहे.

वाशी येथील एपीएमसी मार्केट काही  दिवसांकरिता  बंद  झाल्यामुळे  बाजारातील  गर्दी वाढण्याची  शक्यता लक्षात  घेऊन हा उपक्रम  राबविण्याबाबत  महानगरपालिकेने प्रयत्न केले होते. त्यास यश येऊन आता प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झालेली आहे.

विविध जिल्हयांतील शेतकरी व पुरवठादार यांचेकडून भाजीपाला व फळे पुरवठयाबाबत विचारणा होत होती, त्यांचा समन्वय साधत नागरिकांच्या हितासाठी व लॉकडाऊनचा उद्देश सफल होण्याच्या दृष्टीने हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.   आतापर्यंत श्री  एंटरप्रायझेसमे. परम  कॅटरर्स  ॲन्ड सप्लायर्स, तुकाराम काळे अशा शेतकरी तसेच पुरवठादारांना महानगरपालिकेमार्फत थेट भाजीपाला वाहतुक व विक्रीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे व त्यात वाढ केली जात आहे. 

गृहनिर्माण सोसायटयांच्या मागणीप्रमाणे हा पुरवठा होणार असून याकरिता पुरवठादारास वाहन व कर्मचारी पासेस उपलब्ध करुन देण्यांत आलेले आहेत. यामध्ये पुरवठादारास  वाहतुकीदरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये याकरिता संबंधित जिल्हाधिकारी यांना रितसर पत्रे देण्यात आली  आहेत.

भाजीपाला वाहतुकीच्या वाहनांचे दररोज निर्जंतुकीकरण करण्यात येत असून वाहनांवरील कर्मचारी यांनी मास्क व ग्लोव्हज घालणेबाबत पुरवठादारांस बजावण्यात आलेले आहे.  भाजी विक्री करतांना सोशल डिस्टन्सिंग प्रोटोकॉल पाळला जाईल यांची खात्री करण्याबाबत गृहनिर्माण सोसायटयांच्या पदाधिका-यांना सूचित करण्यात आल्याची माहिती उपायुक्त नितीन काळे यांनी दिली.

या उपक्रमात ज्या शेतक-यांना सहभागी होऊन त्यांच्या शेतातीत भाजीपाला व फळे थेट ग्राहकांना विकण्याची इच्छा असेल त्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेशी 1800222309 / 1800222310 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने सुरु केलेल्या या उपक्रमास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून यामुळे बाजारातील गर्दी कमी होऊन पर्यायाने कोरोना रोगाचा  प्रादूर्भाव रोखण्यासाठी मदत होणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात 6 ते 7 हजार सहकारी गृहनिर्माण संस्था असून त्यापैकी मोठ्या गृहसंकुलामध्ये संस्था पदाघिकारी यांच्याशी संपर्क साधून शेतक-यांनी उत्पादीत  केलेला भाजीपाला थेट संस्थेच्या गेटवर अथवा परिसरात विक्रीसाठी उपलब्ध करुन दिला जात आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात येणारा भाजीपाला हा मुख्यत्वे पुणे, सातारा, नाशिक व अहमदनगर जिल्हयांतून येत असून या थेट विक्रींमुळे शेतक-यांच्या मालाला चांगला भाव मिळत आहे तसेच नागरिकांनाही दर्जेदार व ताजा भाजीपाला रास्त दरामध्ये घरपोच मिळण्यास मदत होत आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने सुरु केलेल्या या उपक्रमास वाढता प्रतिसाद मिळत असून नवी मुंबईत राहणा-या नागरिकांच्या संपर्क साखळीतून शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना राबविली जात आहे. यासाठी शेतकरी, भाजीपाला उत्पादक, वाहतुकदार, संस्था प्रतिनिधी व स्थानिक लोक प्रतिनिधी यांची मदत घेण्यात  येत आहे.

========================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा